धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय
नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन
नागपूर येथे भव्य विजयी सभा
गडचिरोली : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. नागपूर हा केंद्रीयमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचा गड समजला जातो. या गडात निवडणूक लढणे सोपे नव्हते. एकीकडे धनशक्ती उभी होती. तर, दुसरीकडे केवळ कार्यकर्त्यांची फौज होती. धनशक्तीकडून मतदारांना दररोज वेगवेगळी आश्वासने, आमीषे दिली जात होती. परंतु, नागपूर विभागातील सुजान शिक्षक मतदारांनी सर्व आमीषे धुडकावत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठिशी एकजुटीने उभे राहून विजयश्री खेचून आणला. हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा आहे. धनशक्तीविरोधात एकजूट जनशक्तीचा विजय असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील विजयानंतर सुयोगनगरातील सभागृहात आयोजित विजयी सभेत आमदार अडबाले बोलत होते. यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाने, खासदार बाळू धानोरकर, आमदार अॅड. अभिजित वंजारी, डॉ. बबनराव तायवाडे, राजाराम शुक्ला, विमाशिचे अनिल गोतमारे, रमेश काकडे, अरविंद देशमुख, महेंद्र सालनकार, अविनाश बडे, किशोर कानेरे, हरणे, केशवराव ठाकरे, प्रभाकर पारखी, डॉ. गव्हाणकर, महाराष्ट्र राजय जुनी पेन्शन संघटनेचे वितेश खांडेकर उपस्थित होते.
आमदार अडबाले पुढे म्हणाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक महासंघाच्या माध्यमातून नागपूर विभागातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरूनही आंदोलने केली. परंतु, राज्य शासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु, सुरुवातीपासूनच जुनी पेन्शनसाठी आम्ही आग्रही आहोत. ही मागणी पूर्ण होण्यासाठी आता सभागृहात लढा दिला जाईल. कालपर्यंत जुनी पेन्शन देऊच शकत नाही अशी भाषा करणारे निवडणूक काळात ही योजना केवळ आम्हीच देऊ शकतो, असे शिक्षकांना सांगत होते. या लोकांचा दुटप्पीपणा शिक्षक मतदारांनी चांगलाच ओळखला आहे. त्यामुळे माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून जिवाचे रान करून मेहनत घेतली. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, जुनी पेन्शन योजनेचे कार्यकर्ते आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी परिश्रम घेतले. आता माझी जबाबदारी वाढली आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
आमदार वंजारी यांनी, पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीत मला विजयी केले. आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांना विजय करीत इतिहास घडविला आहे. शिक्षक, पदविधरांच्या प्रश्नासाठी आम्ही दोघे मिळून सभागृहात लढा देणार असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांची भाषणे झालीत.
संचालन विठ्ठल जुनघरे यांनी तर आभार अनिल गोतमारे यांनी मानले. यावेळी विमाशी व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.