dada paradhi zadpatti natyakalavant |
चंद्रपूर (प्रतिनिधी) -
झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध लोककलावंत , ज्येष्ठ समाजसेवी दादा अंताराम पारधी (dada paradhi zadpatti natyakalavant) यांचे काल रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने मालडोंगरी (ता. ब्रम्हपुरी) येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ८२ होते. कलावंत म्हणून दादा पारधी यांनी आपल्या आयुष्याचे सुमारे ३५ वर्षे जनप्रबोधनाच्या सेवा कार्यात झाडीपट्टी प्रदेशात दिलेले आहे. नकला, खडी गंमत ,दंडार, नाटकांच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनातून लोकप्रबोधन प्रभावीपणे केलेले आहे.
त्यांनी शासनाच्या साक्षरता अभियान, लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम, आधुनिक शेती, निसर्गोपचार, श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी च्या कार्यांत आपल्या परीने त्यांनी योगदान दिले आहे. कर्मयोगी संत श्रीतुकारामदादा गीताचार्य यांचा पावन सहवास त्यांना लाभला आहे. ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे कार्यकारीणी सदस्य होते. अनेक राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात ते आपली उत्स्फूर्त सेवा देत असत.स्थानिक शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी घुग्घुस येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात विशेष निष्काम सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच गेल्या महिन्यात त्यांना गडचिरोली झाडीबोली साहित्य मंडळाचे वतीने उत्कृष्ट झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या रूपाने आम्ही नकलांच्या माध्यमातून लोकजागृती करणारा झाडीपट्टी लोकनाट्यातील " दादा " गमावला असून त्यांच्या सेवाकार्याचे आम्हाला सदैव स्मरण होत राहील, अशी श्रद्धांजली ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी अर्पण केलेली आहे.