संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ फेब्रुवारी:-
आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
फेब्रुवारी २०२३ यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले. काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचानासह जशीच्या तशीच प्रश्नपत्रिकेत छापून आली आहेत.चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
12वीच्या परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजीचा होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पान नंबर 10 वर प्रश्न क्रमांक 3 आणि त्यात उपप्रश्न होते ए 3, ए 4 आणि ए 5 हे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी थोडे गोंधळले. कारण, यामध्ये ए 3 आणि ए 5 मध्ये प्रश्नच दिलेला नव्हता. तर ए4 मध्ये कवितेच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्या खाली उत्तर सुद्धा देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यामध्ये गोंधळ होता.आता शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बोर्डाने सांगितले की, या त्रुटी संदर्भात आम्ही लवकरच बैठक घेऊ आणि या लवकरच उत्तर देऊ. तिन्ही प्रश्न हे सहा गुणांचे आहेत त्यामुळे सहा गुणांचा बोनस विद्यार्थ्यांना मिळणार का? याबाबत आता बोर्डाचा निर्णय अपेक्षित आहे.शिक्षण मंडळाने एक पत्रक काढलं आहे.
यामध्ये म्हटलं, "फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून आयोजित करण्यात आलेली आहे. आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली. प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत आयोजित करण्यात आली होती. तथापि शिक्षकांचा त्यांच्या धोरणात्मक मागण्यांबाबत बहिष्कार असल्यामुळे सदरची सभा होवू शकलेली नाही. इंग्रजी विषयात्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा पुन:श्च आयोजित करण्यात येवून इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेचा अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी." तर इकडे विद्यार्थी व पालकांनी इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांना या त्रुटीचे सरसकट सहा मार्क विद्यार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी केली आहे