Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १६, २०२३

ज्ञानदान हे जगातले सर्वोत्तम कार्य : ना.मुनगंटीवार | Sudhir Mungantiwar


ज्ञानदान हे जगातले सर्वोत्तम कार्य : ना.मुनगंटीवार | Sudhir Mungantiwar

'लर्न द आयआयटी मंत्राज फ्रॉम आनंद कुमार'मध्ये विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहित

*चंद्रपूर :* ज्ञानदानाचे कार्य हे जगातले सगळ्यात सर्वोत्तम कार्य आहे. प्रा. विजय बदकल आणि आनंद कुमार हे काम अत्यंत प्रभावीपणे आणि मनापासुन करीत आहेत असे गौरवपूर्ण प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, संस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. Sudhir Mungantiwar 

प्रा. विजय बदकल यांच्या 'इन्स्पायर' द्वारा आयोजित 'लर्न द आयआयटी मंत्राज फ्रॉम आनंद कुमार' या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आनंद कुमार, खासदार बाळू धानोरकर, प्रा. विजय बदकल, डॉ. आशिष बदकल उपस्थित होते.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, उच्च शिक्षणातून चांगला समाज घडतो. शिक्षणासोबत संस्कृतीचे ज्ञानही तितकेच आवश्यक आहे. उच्चशिक्षित पिढी घडल्याने भारत 'सुपर थर्टी' वरून 'सुपर हंड्रेड'मध्ये अव्वल स्थानावर येईल. अशाच पिढीतून भारत जेव्हा स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करेल त्यावेळी संपूर्ण जग एकीकडे असेल आणि भारत अव्वल स्थानावर असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुनगंटीवार म्हणाले, ज्ञानाच्या महामार्गावर त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जी पदवी मुलांच्या हातात येते, ती पदवी घेताना मुलांना पाहुन पालकांच्या चेहऱ्यावर आनंद भाव व्यक्त होतात. हे आनंद भाव जगातल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूपेक्षा अधिक किंमती असतात. भौतिक वस्तूंमधुन पालकांना जेवढा आनंद प्राप्त होत नाही; तेवढा आपल्या पाल्याच्या प्रगतीने प्राप्त होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हा आनंद देण्यासाठी दिवस-रात्र एक करावा असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

मिशन शौर्यच्या माध्यमातून चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यावेळी मंत्री म्हणून या मोहिमेला सहकार्य केले. आठ महिन्यांच्या अथक परिश्रमातून सुमारे 18-19 वर्षांचे आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्ट सर करू शकतात तर कोणताही विद्यार्थी मेहनत करत कोणत्याही परीक्षेचे आव्हान पेलू शकतो. असेच मेहनती विद्यार्थी भारताला महासत्ता बनवू शकतात, असा ठाम विश्वास व्यक्त करीत ना.मुनगंटीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. Sudhir Mungantiwar 

प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकलव्या प्रमाणे आपले ध्येय गाठण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे. विद्यार्थ्यांनी एकदा ज्ञानाची आराधना चालू केली तर, त्यांच्यासाठी कोणत्याही परीक्षेत यश मिळवणे अशक्य नाही. अशाच मेहनती विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य आनंद कुमार करीत आहेत. आनंद कुमार यांचे विचार ऐकून विद्यार्थ्यांनी ठरवावे की त्यांना कोणत्या यश शिखराकडे वळायचे आहे. यशाचा हा मार्ग ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंतर्मुख होणे नितांत गरजेचे आहे. अंतर्मुख होऊन अंतर्मनातून विद्यार्थ्यांनी ठरवले तर ते जीवनातील अवघडातली अवघड परीक्षा ही पास होऊ शकतात. वेळेचे सुयोग्य नियोजन केले तर कठीण दिसणाऱ्या गोष्टीही सोप्या वाटू लागतात. असे यशाचे गमक विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.