वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अपेक्षा
‘सिमाकॉन एक्स कॉन्फरन्स’मध्ये ‘सिएसआर’ निधी देण्याची ग्वाही
चंद्रपूर: देशगौरव, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशांतर्गत संशोधनाला वाव मिळावा यासाठी विविध योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. चंद्रपुरातील इंडियन मेडिकल असोशिएशनशी संलग्न डॉक्टर स्थानिक पातळीवर या संशोधनात भाग घेऊ शकतात. त्यासाठी ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करता येईल, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर शाखेच्या वतीने आयोजित ‘सिमाकॉन एक्स कॉन्फरन्स’च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयएमए महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, पूर्वाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, यशवंत देशपांडे, सचिव डॉ. संतोष कदम, परिषदेचे अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित, सचिव डॉ. अमरीश बुक्कावार, इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, सचिव डॉ. नगीना नायडू, महिला आघाडी अध्यक्ष डॉ. कल्याणी दीक्षित उपस्थित होते.
ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपुरात आयएमएचे भव्य सभागृह लवकरच उभारण्यासाठी आपण सहकार्य करणार आहोत. चंद्रपुरामध्ये सुसज्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. आपल्या प्रयत्नांतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीनंतर चंद्रपुरात टाटा कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात चंद्रपूरमध्ये होत असलेल्या या बदलांना लक्षात घेत येथील डॉक्टरांनीही संशोधनात्मक वैद्यकीय विज्ञानावर भर द्यावा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रयत्नाने जगातील सर्वांत मोठी आरोग्य चळवळ ‘आयुष्मान भारत’ देशात राबविली जात आहे.देशात एम्स रुग्णालयांची संख्या 22 झाली आहे.
वैद्यकीय उपचारांबाबत यापूर्वी आपण पाश्चात्त्य देशांवर अवलंबून राहत होतो. परंतु, आता परदेशातील रुग्णही चेन्नई येथे गंभीर आजारांवरील उपचारासाठी येतात, असे अभिमानाने नमूद करून मुनगंटीवार म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात भारताने केलेली क्रांती ही कोविड काळात जगाने बघितली आहे. कोरोनाची महासाथ जगामध्ये थैमान घालत असताना भारतीय बनावटीच्या लसीने अनेक देशांना तारले.चंद्रपुरातील डॉक्टरांनीही वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात अशा संशोधनाची कास धरावी. त्यातून रुग्णांवर अचूक उपचार तर होतीलच, परंतु समाजाचे ऋण फिटेल, असा विश्वास ना.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अर्पणा देवईकर, डॉ. वंदना रेगुंडवार यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रितेश दिक्षीत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अमरीश बुक्कावार यांनी केले.