भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा घणाघात
निर्भया निधीतील वाहनांबाबत खा. सुप्रिया सुळे , खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सारखा प्रकार आहे. निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहने मविआ सरकारच्या कार्यकाळातच मंत्र्यांच्या दावणीला बांधली गेली होती , असा घणाघात भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ही वाहने पुन्हा निर्भया पथकात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आठवडाभरात ती पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
BJP Media Maharashtra
निर्भया निधीतून खरेदी करण्यात आलेली वाहने मविआ सरकारच्या कार्यकाळात कोणकोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात होती , याचा तपशीलच श्रीमती चित्रा वाघ यांनी आकडेवारी आणि तारखेसह यावेळी सादर केला. त्यांनी सांगितले की , महाविकास आघाडी सरकारने निर्भया निधीतून २२० वाहने खरेदी केली. यातील १२१ वाहने ठाकरे सरकारने ४ फेब्रुवारी २२ रोजी मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांना दिली. १९ मे २२ रोजी राज्य सरकारच्या वेगवेगळया विभागांना ९९ वाहने देण्यात आली.
छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुभाष देसाई यासारख्या मंत्र्यांच्या ताफ्यात निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहने होती. एवढेच नव्हे तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा ताफ्यातही याच निधीतून खरेदी केलेली वाहने होती. असे असताना खा. सुळे आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर केलेले आरोप हा ''चोराच्या उलट्या बोंबा'' सारखा प्रकार आहे. निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहने मविआ मंत्र्यांच्या दावणीला बांधली गेली होती त्यावेळी खा. सुळे, खा. चतुर्वेदी गप्प का होत्या असा सवालही त्यांनी केला.