पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने केंद्रीय मार्ग निधीतुन दोन मोठया पुलांच्या बांधकामासाठी ११० कोटी रू. निधी मंजूर
*वैनगंगा नदीवर जुनगांव-देवाडा-नांदगांव या रस्त्यावर मोठया पुलाच्या बांधकामासाठी ७० कोटी रू. निधी**पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीवर मोठया पुलाचे बांधकामासाठी ४० कोटी रू. निधी**केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार*
राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने केंद्रीय मार्ग निधीतुन चंद्रपूर जिल्हयात ११० कोटी रू. किंमतीच्या मोठया पुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. या पुलांच्या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधीतुन निधी मंजूर व्हावा यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या कडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून निधी मंजूर करविला आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे. Minister Sudhir Mungantiwar
चंद्रपूर जिल्हयातील वैनगंगा नदीवर जिल्हा सीमेपासून जुनगांव-देवाडा-नांदगांव या रस्त्यावर अॅप्रोच रोडसह मोठया उंच पुलाचे बांधकाम करण्यासाठी ७० कोटी रू. निधी तर पोंभुर्णा तालुक्यातील नविन राष्ट्रीय महामार्गपासून देवई-चिंतलधाबा-सोनापूर-मोहाळा-नवेगांव मोरे-दिघोरी–पिपरी देशपांडे ते जिल्हा सीमेपर्यंत सोनापूर-मोहाळा या दोन गावांमध्ये अंधारी नदीवर मोठया उंच पुलाचे बांधकाम करण्यासाठी ४० कोटी रू. निधी केंद्रीय मार्ग निधीतुन मंजूर करण्यात आला आहे. वने, सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्याशी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. नवी दिल्लीत श्री. नितीन गडकरी यांची भेट घेवून त्यांना विनंती देखील केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप सदर मोठया पुलांच्या बांधकामासाठी ११० कोटी रू. निधी केंद्रीय मार्ग निधीतुन मंजूर करण्यात आला आहे.
या आधीही केंद्रीय मार्ग निधीच्या माध्यमातुन श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनेक महत्वपूर्ण रस्ते व पुलांची बांधकामे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आली आहे. प्रामुख्याने आक्सापूर-पोंभुर्णा-जानाळा मार्गाचे २५ कोटी रू. किंमतीचे दुरूस्तीकरण, चंद्रपूर-मुल-गडचिरोली मार्गाचे १५ कोटी रू. किंमतीचे दुरूस्तीकरण, मुल-चिंचाळा-भेजगांव-पिपरी दिक्षीत-येरगांव मार्गावरील उमा नदीवरील पुलाचे १० कोटी रू. किंमतीचे बांधकाम, मुल-चामोर्शी रस्त्यावरील उमा नदीवरील २३ कोटी रू. किंमतीचे मोठया पुलाचे बांधकाम, कोलगांव ते विसापूर मार्गावर वर्धा नदीवर ५६ कोटी रू. किंमतीचे मोठया पुलाचे बांधकाम, बल्लापूर तालुक्यातील मानोरा फाटा ते इटोली आणि इटोली-किन्ही-येनबोडी या रस्त्याचे २५ कोटी रू. किंमतीचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम, मुल तालुक्यातील मोरवाही गावाजवळ उमा नदीवर २४.२९ कोटी रू. किंमतीच्या मोठया पुलाचे बांधकाम, डोंगरगांव या गावाजवळ उमा नदीवर २१.८३ कोटी रू. किंमतीचे मोठया पुलाचे बांधकाम, मोहुर्ली-चंद्रपूर-जुनोना-सातारा-पोंभुर्णा –नवेगांव मोरे या रस्त्याचे ८० कोटी रू. किंमतीचे मजबुतीकरण व डांबरीकरण, पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे ५० कोटी रू. किंमतीचे मोठया पुलाचे बांधकाम आदी महत्वपूर्ण विकासकामे केंद्रीय मार्ग निधीतुन सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर करविली आहे. Minister Sudhir Mungantiwar
केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांचा चंद्रपूर जिल्हयावर विशेष स्नेह आहे. आजवर विकासासंबंधी जी मागणी आम्ही श्री. नितीनजी गडकरी यांच्याकडे केली ती प्राधान्याने त्यांनी पूर्ण केली आहे. विकासाची अभूतपूर्व दृष्टी लाभलेल्या या लोकनेत्याने या दोन पुलांसाठी ११० कोटी रू. निधी मंजूर करून चंद्रपूर जिल्हा वासियांना मोठी भेट दिली आहे. भविष्यातही विकासासंबंधी त्यांचे असेच उदात्त सहकार्य आम्हाला लाभेल असा विश्वास व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.