कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करावा - जिल्हाधिकारी
Ø 27 डिसेंबरला आरोग्य केंद्रांवर ‘मॅाक ड्रिल’चे आयोजन
Ø जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा
नागपूर, दि. 25 : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करीत मास्कचा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राज गजभिये, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय बिजवे, एम्सच्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.विभा दत्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. एन.बी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, टास्क फोर्सचे रवींद्र सरनाईक, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चीनसह पूर्वेकडील देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. चीनमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात 27 डिसेंबरला ‘मॅाक ड्रिल’चे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तयारी संदर्भातील आढावा या मॅाक ड्रिलदरम्यान घेण्यात येणार आहे. यात रुग्णालयातील खाटांची उपलब्धता, आवश्यक औषधांची उपलब्धता, कोरोनाची तपासणी, ॲम्ब्युलन्सची उपलब्धता, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, टेलिमेडिसिन सेवा, मनुष्यबळाची उपलब्धता आदींचा आढावा यादरम्यान घेण्यात येणार आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इतर देशांमधून येणा-या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.
सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आढळल्यास कोरोनाची चाचणी करावी. स्वतःला सर्वांपासून विलग करून घ्यावे. कोरोनाच्या पंचसूत्रीचे पालन करावे. 18 वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करावे. विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण प्राधान्याने करावे. लसीकरण हाच कोरोनापासून बचावाचा मार्ग आहे. समाजध्यमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या कोरोना संदर्भातील कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना संदर्भातील सुचना, माहिती व दिशानिर्देश वेळोवेळी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. ख्रिसमस व नववर्षाचे कार्यक्रम साजरे करताना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.