सरपंचपदी काँग्रेसच्या हिराबाई पंधरे.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे सत्तांतर.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ डिसेंबर:-
परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या नवेगावबांध ग्रामपंचायतच्या सरपंच पदासह १७ सदस्यांच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून, गेल्या पंधरा वर्षापासून चा भारतीय जनता पक्षाचा किल्ला यंदा ढासळला असून,या निवडणुकीत प्रस्थापितांविरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आघाडीला घवघवीत यश यंदा मिळाले आहे. ग्रामपंचायतला स्वतःची मक्तेदारी समजणार्या विद्यमान सदस्यांना मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. सरपंच पदासह आघाडीला ११ जागा, १ अपक्ष व भारतीय जनता पक्ष समर्थित विकास पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत. सरपंच पदावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हिराबाई नीलमचंद पंधरे या विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पक्षाचे दिग्गज व किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे, माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच रघुनाथ लांजेवार,प्रभाग ६ मधून संजय उजवणे यांचा या निवडणुकीत यंदा दारूण पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाने भाजपा प्रणित विकास पॅनलला फार मोठा धक्का बसला आहे.रघुनाथ लांजेवार यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देवाजी कापगते यांचा विजय झाला आहे.
प्रभाग २ व ६ ची निवडणूक लक्षवेधी होती.संपूर्ण गावाचे लक्ष या निवडणुकीत या प्रभागाकडे लागले होते.
सरपंच पदाच्या निवडणूक साठी एकूण ५ उमेदवार रिंगणात होते. सरपंच पदासाठी ६ प्रभागामध्ये ही निवडणूक चुरशीची झाली होती.१८ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम पेटीत बंद झाले होते.
सरपंच पदासाठी एकूण ५ उमेदवार रिंगणात होते. सहाही प्रभागात सरपंच पदा साठी चुरशीची लढत झाली होती.
काँग्रेसच्या हिराबाई नीलमचंद पंधरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या इंदू डीडेश्वर पंधरे व माजी सरपंच खंबायती मडावी यांचा पराभव करून, विजयी झाल्या. यात माजी सरपंच खांबाबाई राजेंद्र मडावी, अपक्ष उमेदवार डिंपल दिलीप पंधरे ह्या पराभूत झाल्या.
प्रभाग क्रमांक १ मधून
सर्वसाधारण पुरुष गटातून अपक्ष उमेदवार प्रेमचंद चांदेवार यांनी काँग्रेसचे दिग्गज जगदीश पवार, भाजपाचे हितेंद्र राऊत यांच्यात झालेल्या तिरंगी लढतीत पराभूत केले आहे. दोन्ही पक्षाच्या मातब्बर उमेदवारांना हरवून प्रेमचंद चांदेवार यांनी बाजी मारली.सर्वसाधारण महिला राखीव गटातून भारतीय जनता पक्षाच्या सीमा योगेश बडोले यांनी काँग्रेसच्या सुप्रिया हितेंद्र डोंगरे यांचा पराभव करून विजय मिळविला.
अनुसूचित जमाती गटातून काँग्रेसचे विजय नीलकंठ कुंभरे यांनी भारतीय जनता पक्षाचे बाबुराव तुळशीराम कोरेटी, अर्चना संतोष मलगाम यांचा पराभव करून विजय मिळविला आहे.
प्रभाग २ मध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव गटातून भाजपाच्या सुरेखा येळाम यांनी विजय मिळवला. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्षा पुराम, वृंदा सयाम यांना पराभूत केला.तर सर्वसाधारण महिला गटातून भाजपाच्या मीना पहाडे यांनी काँग्रेसच्या जयश्री लोकेश पसीने व शालू झोळे
यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या गटातून भारतीय जनता पक्षाचे अशोक हांडेकर यांचा पराभव करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पितांबर काशीवार विजयी झाले आहे.अनुसूचित जमाती महिला गटातून भाजपाच्या शितल पुसाम यांचा पराभव करून,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरिता नाईक विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ४ मधून सर्वसाधारण गटातून भारतीय जनता पक्ष प्रणित विकास पॅनलचे रेशीम काशीवार निवडून आले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे ऋषी पुस्तोडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शैलेश शर्मा. यांचा पराभव केला. अनुसूचित जाती महिला गटातून प्रियंका निलेश सांगोळकर ह्या विजयी झाल्या,त्यांनी भाजपाच्या उमेदवार उषा राजेंद्र साखरे यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटातून काँग्रेसच्या दुर्गा दीपक शहारे ह्या विजय झाल्या असून,त्यांनी भाजपाच्या दीपलता विलास राऊत यांच्या पराभव केला
प्रभाग क्रमांक ५ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी सरपंच लीना डोंगरवार यांचे पती रमेश डोंगरवार यांनी भाजपाचे नितेश्वर मस्के व आघाडी पॅनल चे
धनंजय डोंगरवार यांचा पराभव करून विजय संपादन केला आहे. अनुसूचित जाती महिला गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हेमलता बडोले यांनी भाजपाच्या पल्लवी भूमके यांना पराभूत करून विजय संपादन केले. तर सर्वसाधारण राखीव महिला गटातून कांग्रेसचे जयश्री पशीने यांचा पराभव झाला असून भाजपाच्या पूजा कापगते यांचा विजय झाला आहे.प्रभाग क्रमांक दोन प्रमाणे प्रभाग क्रमांक सहा ची निवडणूक रंगतदार, चुरशीची व लक्षवेधी आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधून सर्वसाधारण पुरुष गटातून भारतीय जनता पक्षाचे राकेशकुमार कोल्हे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दिलीप शिपानी व काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार, संजय उजवणे यांच्यात झालेल्या तिरंगी काट्याच्या लढतीत काँग्रेस पक्षाचे दिलीप शिपानी यांनी ही जागा स्वतः कडे खेचून आणली.प्रभाग क्रमांक २ प्रमाणेच प्रभाग क्रमांक ६ मध्ये कोण बाजी मारतो याकडे साऱ्या गावकऱ्यांचे लक्ष लागले होते.विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय उजवणे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.हम करे शो कायदा त्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसून आले.ग्रामपंचायतचे किंग मेकर म्हणून,त्यांना गावात ओळखले जाते.मात्र या निवडणुकीत मतदारांनी त्यांना चांगलाच दणका दिला. मतदारांची नाराजी त्यांनी ईव्हीएम मधून दाखवून दिली. दिलीप शिपानी यांच्यामुळे एक प्रबळ उमेदवार म्हणून मतदारांना एक नवीन पर्याय मिळाला आहे. गावात एक मनमिळाऊ,गरजेच्या वेळी धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते,असे दिलीप उर्फ बबलू शिपानी यांची ओळख असून,ऐनवेळी मतदारांच्या कल शिपानी यांच्याकडे झुकल्यास नवल वाटू नये.
अनुसूचित जाती गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चेतन साखरे,भाजपाचे नवीनकुमार उके, ईश्वर शहारे यांचा पराभव करून काँग्रेस पक्षाचे लेनीन राऊत यांनी या प्रभागात विजय मिळवला आहे.
ग्रामपंचायत करिता झालेल्या निवडणुकीत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या नवेगाव बांध ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीला धूळ चाखवून मतदारांनी ग्रामपंचायत मधून भाजपाकडून काँग्रेस राष्ट्रवादीकडे सत्तांतर केले आहे.काँग्रेस पक्षाच्या हिराबाई नीलमचंद पंधरे या थेट जनतेतून सरपंच पदाकरिता निवडणूक जिंकल्या तर उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची वर्णी लागणार?अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे नवेगावबांध या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्के देत पराभवाचा दणका देत सत्तांतर घडवून आणला आहे.मतदारांनी नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे.आमच्या शिवाय ग्रामपंचायत चालूच शकत नाही, आमचीच गरज आहे?या अहंकारी वृत्ती बाळगणाऱ्या उमेदवारांना जनतेने मतदान नाकारून विद्यमान सत्तापिपासुना सत्तेच्या बाहेर फेकले आहे.विशेष म्हणजे या निवडणुकीने गावामध्ये गावकऱ्यांना नवचैतन्य आले असून, परिवर्तन झाल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत मधील गैर कारभार निर्वाचित सरपंच व सदस्या कडून दूर होण्याची व स्वच्छ प्रशासन ची आशाबाळगून नवेगावबांधवांसीयांनी सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे. सरपंचासह सर्व सदस्य येत्या पाच वर्षाच्या काळात नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती करतात की कसे याबाबत गावकरी अपेक्षा ठेवून आहेत.