रामू तिवारी यांचे आवाहन
चंद्रपूर :
काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला देशभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. ७ नोव्हेंबरपासून ही यात्रा महाराष्ट्रातून पुढील प्रवास करणार आहे. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना १५ नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यातून यात्रेत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.
भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येत आहे. राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात, ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान हिंगोली जिल्ह्यात, १५ ते १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, १६ ते १८ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि १८ ते २० नोव्हेंबर रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गक्रमण करणार आहे. भारत जोडो यात्रेचा साडेतीन हजार किमीचा प्रवास ही काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून माजी पालकमंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. चंद्रपूर शहरात तरुणांची बाइक रॅली काढण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथून यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. तिवारी यांनी केले आहे.
सामाजिक संस्था, इच्छुकांनी करावा संपर्क
भारत जोडो यात्रा ही देशाच्या इतिहासातील पहिलीच यात्रा आहे. या यात्रेत केवळ काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्तेच नाही, तर देशावर प्रेम करणारा प्रत्येक भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. चंद्रपूर शहरातील सामाजिक संस्था, इच्छुक नागरिकांना या यात्रेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी शहरातील कस्तुरबा चौकातील चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. तिवारी यांनी केले आहे