कोरोणाच्या महामारीमुळे कंबरडे मोडलेल्या उद्योगांना नवसंजीवनी देऊन उद्योग क्षेत्राला स्थैर्य देण्यासाठी काँग्रेसचे औद्योगिक सेल नियोजनबद्धपणे कार्य करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत सोनारे यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उद्योग सेलच्या वतीने श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या चंद्रपूर जिल्हा नवीन कार्यकारिणीची घोषणा त्यांनी यावेळी केली.
ते म्हणाले, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे मोठा फटका बसला आहे. राज्यातील बहुतांश उद्योग पर्यायाने उद्योजक, त्यांच्यावर अवलंबून असणारे लघु उद्योजक, लाखो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब अक्षरशा देशोधडीला आले आहेत. बेरोजगारांची संख्या करोडोने वाढत आहे. एकूण जनमानसांमध्ये संतापाची लाट आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला सावरण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. हेमंत सोनारे यांनी केले.
राज्याला सक्षम आणि वैभवशाली बनवणाऱ्या उद्योगांना राजकारणापलीकडे जाऊन ताकद देण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक गौण संसाधन मोठ्या प्रमाणात आहे. परंतु उद्योग निर्मिती नाही. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची गरज आहे. कृषीउद्योगिक दर्जा प्राप्त होण्यासाठी शेती गटाला चालना देऊन सेंद्रिय शेती, शेती पूरक व्यवसाय, ग्रामीण आणि शहरी प्रक्रिया उद्योग, बाजार मूल्य साखळी निर्मिती, याशिवाय खाजगी आणि सामूहिक उद्योजक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कक्षेत कार्यरत राहून उद्योजकांना आधाराची गरज असल्याचे ते म्हणाले.