बालकाव्यसंग्रहामधील रचना मुलांना कल्पना शक्तीच्या जगात नेऊन त्यांचे भावविश्व समृद्ध करणा-या - बंडोपंत बोढेकर
चंद्रपूर (प्रतिनिधी) -
झाडीबोली साहित्य मंडळाच्या सदस्या जेष्ठ कवयित्री सौ. मंजुषा प्रकाश दरवरे यांच्या चिंटूची स्वप्ननगरी या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन आ. किशोर जोरगेवार यांचे हस्ते झाले. चांदा ब्रिगेड सामाजिक संस्था आणि झाडीबोली साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख भाष्यकार म्हणून डॉ. सुधीर मोते (भद्रावती), झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाप्रमुख अरुण झगडकर, कवयित्री सौ. मंजुषा दरवरे उपस्थित होत्या. याप्रसंगी आ. जोरगेवार यांनी झाडीबोली चळवळीच्या साहित्य विषयक कार्याचा गौरव केला आणि म्हणाले, आपल्या झाडीपट्टीची प्राचीन संस्कृती फार मोठी आहे. येथील दंडार, खडी गंमत आणि लोकसाहित्य सर्वदूर पोहोचवले पाहिजेत. कारण त्यात मनोरंजनासोबत प्रबोधन आहे. झाडीबोली झाडीपट्टी प्रदेशातील जनतेचा श्वास आहे. भाष्यकार डॉ. मोते यांनी हा बालकाव्यसंग्रह बालकांवर गाढ भावनिक संस्कार करणारा असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामगीताचार्य बोढेकर म्हणाले, चिंटूची स्वप्ननगरी या बालकाव्यसंग्रहामधील रचना मुलांना कल्पना शक्तीच्या जगात नेऊन त्यांचे भावविश्व समृद्ध करणा-या आहे . संस्कारांतून मूल्यशिक्षण देणे हे या काव्य संग्रहाचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक अरुण झगडकर यांनी केले तर कवयित्री सौ. दरवरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गीता रायपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुनबानो शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रिताचे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी यवनाश्व गेडकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून कवी प्रदीप देशमुख आणि धनंजय साळवे यांची उपस्थिती होती. या कवी संमेलनात संतोष मेश्राम,अनिल आंबटकर,उपेंद्र रोहणकर,विनायक धानोरकर,संगिता बांबोळे,प्रीती जगझाप,धनंजय पोटे,विरेन खोब्रागडे,भारती लखमापूरे,तेजस्वीनी बरडे,पंडित लोंढे,नरेश बोरीकर,प्रशांत भंडारे,सुरेश गेडाम,सु.वि.साठे,रमेश भोयर,क्षितीज शिवरकर,पांडुरंग कांबळे,ज्योती सरस्वती,निरज आत्राम,संगिता धोटे,स्वप्नील मेश्राम,खुशाल कामडी,अरूण घोरपडे,शितल कर्णेवार,जयंती वनकर आदी कवींनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.या कविसंमेलनाचे सुत्रसंचालन सुनील बावणे यांनी केले तर आभार अनिल पिट्टलवार यांनी मानले.