Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २१, २०२२

समाजातील प्रत्येक ठिकाण महिलांसाठी हक्काचे ‘माहेर’ व्हावे : खा. सुप्रियाताई सुळे

ऑन धिस टाईम माहेर कट्टा राज्यस्तरीय शुभारंभ

*तेजस्वीनी पंडित यांच्या हस्ते ३५ कर्तृत्ववान महिला माधवबाग प्रायोजित युनिव्हर्स ओटीटी वुमन अचिव्हर्स अवार्डने सन्मानित*



*नागपूर, ता. २० :* आज समानता आणि महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी केल्या जात असल्या तरी हुंडा, स्त्री भ्रूण हत्या अशा समस्या अजूनही उभ्या आहेत. अशाही वातावरणात आलेल्या संकटांना तोंड देत कर्तृत्व सिद्ध करून ‘अचिव्हर्स’ ठरलेल्या महिलांना माहेर कट्टाद्वारे सन्मानित करणे ही सुखद आणि आनंददायी बाब आहे. माहेर म्हणजे आधार, असा कट्टा फक्त स्त्रीने लग्नाआधी राहिलेल्या ठिकाणीच होईल असे नाही. ज्या ठिकाणी महिलांना त्यांच्या मुक्त पंखांना बळ देणारा आधार मिळतो ते प्रत्येक ठिकाण ‘माहेर कट्टा’ आहे. समाजातील प्रत्येक ठिकाणी महिलांच्या हक्काचे ‘माहेर’ निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.

महाराष्ट्रातील अग्रगण्य डिजिटल माध्यम ऑन धिस टाईम माहेर कट्टाच्या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून ऑनलाईन माध्यमातून त्या बोलत होत्या. सोमवारी (१९ सप्टेंबर) नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये ख्यातनाम अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ३५ कर्तृत्ववान महिलांना ‘माधवबाग प्रायोजित युनिव्हर्स ओटीटी वुमन अचिव्हर्स अवार्ड-२०२२’ ने सन्मानित करण्यात आले. युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रा.लि. हे या सन्मान सोहळ्याचे सहप्रायोजक होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूबी सोशल वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष रुबीना पटेल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून युनिव्हर्स महिला नागरी सहकारी पतसंस्था चंद्रपूरच्या स्नेहा भरत धोटे, माधवबाग नागपूरचे चीफ एम्प्रुव्हमेंट ऑफीसर डॉ. प्रवीण धाडीगावकर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे उपसंचालक दिलीप कुळकर्णी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार श्रीकृष्ण चौबे, सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स व ऑन धिस टाईम मीडियाचे चेअरमन संदीप थोरात, ऑन धिस टाईम मीडियाच्या व्यवस्थापकीय संचालक कांचन बिडवे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद आंबेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व द्वारकाधिस प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले.

पुढे बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, जिजाऊ, सावित्रीबाई, ताराराणी, अहिल्याबाई या सर्व महिलांनी त्यांना कुठलिही संधी किंवा आरक्षण नसताना स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावर दिशादर्शक कार्य केलेत. हाच एक आदर्श ठेवून कार्य केल्यास प्रत्येक संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य निर्माण होईल. या महिलांच्या कार्याचा आदर्श ठेवून प्रत्येक संकटांशी संघर्ष करा, असा मंत्रही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला. 

*महिला ही नेहमीच सक्षम : तेजस्विनी पंडित*
आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याचे, त्या परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य स्त्री मध्ये आहे. स्त्री कणखर आहे, ती बळकट आहे. म्हणूनच आत्महत्या करणारी एकही स्त्री असत नाही. उलट पुरूषाने आत्महत्या केल्यानंतर मोडकळीस आलेल्या संसाराला सक्षमपणे सांभाळत आलेल्या परिस्थितीचा तेवढ्याच कणखरतेने ती सामना करते. आज महिला सक्षमीकरण म्हटले जात असले तरी महिला ही आधीपासूनच सक्षम आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी केले. 


त्या म्हणाल्या, जगात जी काही उत्क्रांती झाली ती स्त्री चीच झालेली आहे. पुरूष जे काही करतो ते जगमान्य असते मात्र स्त्रीने काही केले की ते जगमान्य ठरत नाही. एखादी महिला कलाकार झाली, कलेक्टर झाली किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात तिने ठसा उमटविला तर तिचा उदोउदो केला जातो. पुरूषाने या सर्व गोष्टी केल्यास त्याला ते त्याचेच क्षेत्र आहे असे मानून घेतो, असेही त्या म्हणाल्या. स्वत: एक कलावंत म्हणून आपल्याही वाट्याला आलेल्या संघर्षाबद्दल त्या बोलल्या. आज अभिनय क्षेत्रातील मोठे नाव म्हणून आपल्याकडे पाहिले जात असले तरी यामागे खूप मोठे संघर्ष, सातत्य आणि चिकाटी असल्याचे त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांपेक्षा जास्त सक्षम ही प्रत्येक गृहिणी आहे. पुरूषांनी केवळ महिला दिनालाच महिलांना शुभेच्छा देत बसण्यापेक्षा प्रत्येक दिवस आपल्या घरात वेगवेगळ्या रुपात वावरणा-या स्त्रीला सेलिब्रेट करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तेजस्विनी पंडित यांनी ‘माधवबाग प्रायोजित युनिव्हर्स ओटीटी वुमन अचिव्हर्स अवार्ड २०२२’च्या पुरस्कार्थींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


महिलांमध्ये उत्तम व्यवस्थापन कौशल्य : संदीप थोरात
आज बदलत्या युगात महिला स्वत: खंबीरपणे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. महिलांकडे जन्मत:च व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य अंगीकृत आहे. आपण स्वत: आपल्या तीन कंपन्यांचे नेतृत्व महिलांकडे सोपविल्याचे यावेळी सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स आणि ऑन धिस टाईम मीडियाचे चेअरमन संदीप थोरात यांनी सांगितले. अहमदनगर येथे महिलांच्या सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे. येथे १०० महिलांनी एकत्र येउन सहकारी तत्वावर माहेर ब्युटीपार्लर सुरू केले आहे. सहकार तत्वावर सुरू असलेले हे ब्युटी पार्लर महाराष्ट्रातील पहिले असून यामाध्यमातून महिला स्वत:सह एकमेकींचे सक्षमीकरण करत असलयाचेही ते म्हणाले. समाजात विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर योगदान देणा-या कर्तृत्वान महिलांना ‘माधवबाग प्रायोजित युनिव्हर्स ओटीटी वुमन अचिव्हर्स अवार्ड २०२२’ प्रदान करताना आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. सहप्रायोजक युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रा.लि. यांच्या सहकार्यासाठी त्यांनी यावेळी आभार मानले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष रूबी सोशल वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष रुबीना पटेल यांनी माहेर कट्टाच्या उपक्रमांचे कौतुक केले. पुढेही माहेर कट्टाच्या माध्यमातून महिलांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याचे त्यांनी सूचित केले. प्रास्ताविका ऑन धिस टाईम मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद आंबेकर यांनी ऑन धिस टाईम आणि माहेर कट्टाच्या कार्याची माहिती दिली. 

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले व शेवटी त्यांनी आभारही मानले.

*‘स्वरयात्री’च्या गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध*
माहेर कट्टा शुभारंभ आणि माधवबाग प्रायोजित युनिव्हर्स ओटीटी वुमन अचिव्हर्स अवार्ड २०२२ या कार्यक्रमामध्ये दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व द्वारकाधिस प्रतिष्ठानच्या वतीने बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चंद्रपूर येथील ‘स्वरयात्री’ ग्रुपद्वारे बहारदार गीतांचे सादरीकरण करण्यात आले. गायक नंदराज जीवनकर आणि ज्योती तोहगावकर यांनी एकाहून एक नव्या जुन्या, मराठी आणि हिंदी गीतांचे सादरीकरण केले. उपस्थित प्रेक्षकांनीही या कलावंतांच्या गायनाला दाद दिली. 

*या ठरल्या वुमन अचिव्हर्स* 
भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम (हलगेकर), वैशाली वाघमारे, रश्मी संगल तिरपुडे, दर्शना घुले, श्वेता देशमुख, श्रद्धा राऊत मच्छिरके, पुष्पा गिरोलकर, रुचिका खैरकर मेश्राम, सिंधू पिपलेवार, सरला फरकाडे, भावना कदम, चेतना पडोले, जयश्री पुंडकर, टीएस ॲग्रो ऑरगॅनिक्स प्रा.लि.कडून लता गहाणे व स्नेहलता गडपायले, निशी चौबे, डॉ. स्वर्णिमा सिन्हा, हर्षलता बेलखेडे, नेहा मिश्रा, द स्कालिंक अकॅडमी नागपूर, पायल कापसे, रेखा भोंगाडे, दिशा रितेश निलावार, अल्का विनोद कोथळे, विजया पी. गोरे, शीतल झनक सास्ते, लोककला सेवा मंडळ, प्रणिता कडू, ज्योत्स्ना नितनवरे, रेश्मीरेखा जयंत प्रहराज (डॉली), अश्विनी कार्लेकर, जया गुप्ता, लीना रामकृष्णन, प्रा. संगीता इंगोले, पूजा सेठ (धुर्वे), नंदिनी नौकरकर.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.