वडेगाव (मेंढा) येथे ग्रामनवनिर्माण अभियान: व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी तथा रोगनिदान शिबिराचे यशस्वी आयोजन
गडचिरोली ( प्रतिनिधी)-
ग्रामगीता प्रणित ग्रामनवनिर्माण अभियानाअंतर्गत वडेगाव मेंढा येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समाजसेवी डॉ. चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकिय अधिकारी डॉ. भूवन मेश्राम, ज्येष्ठ श्रीगुरुदेव प्रचारक प्रल्हादजी खुणे (आंधळी) , नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार, पोलिस पाटील जगदीश वनवे (डोंगरतमाशी), सत्यसाई सेवा समितीचे सेवादल फार्माशिष्ट नामदेव लाकुडवाहे , डोमाजी गेडाम, प्रभाकर भागडकर , दीपक बद्दलवार , निहार रायपुरकर आदीमान्यवर प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक ज्येष्ठ श्री गुरुदेव प्रचारक उदाजी बावणे महाराज यांनी केले. मनुष्यांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी आणि आपले आरोग्य कसे जपावे यासंदर्भात डॉ.लेनगूरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. ग्रामगीता प्रणित ग्रामनवनिर्माण अभियान हा ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम असून लोकसहभागातून मानवसेवेचे उत्तम कार्य या माध्यमातून होते आहे,ही अभिनंदनीय बाब असल्याचे ग्रामगीताचार्य बोढेकर म्हणाले.
ग्रामनवनिर्माण अभियान समितीतर्फे वडेगाव येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या आशिष दुगे, कु. मयुरी कुमरे, मयुर हलामी यांचा सन्मानपत्र व ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. शिवनाथ कुंभारे अमृत महोत्सवी कार्यगौरव पुरस्कार उदाजी बावणे महाराज यांना देण्यात आला. तर वडेगाव येथे ग्रामनवनिर्माण कार्यात सहभाग देणारे शामराव हजारे,वामन जोशी, नामदेव कोवे, सुधाकर जोशी, लक्ष्मीबाई कुमरे आदींना ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी नंदकिशोर मसराम यांनी केले.
या कार्यक्रमात श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आरमोरी तालुका सेवाधिकारी म्हणून उदाजी बावणे महाराज यांची निवड करण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात आले. युवा वर्ग व्यसनांच्या आहारी जाऊ नये. स्वतःवर संयम ठेवावा,दारू - तंबाखू या सारख्या घातक व्यसनांपासून दूर राहावे असे जनजागृती करणारे पोस्टर प्रदर्शन वडेगाव येथे नशाबंदी मंडळाचे वतीने लावण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनीचा आणि सत्य साई सेवा मंडळाच्या वतीने आयोजित रोगनिदान शिबिराचा लाभ वडेगाव, डोंगरतमाशी आणि कुरंडी चक येथील ११६ लोकांनी घेतला तर १६ रूग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले, हे विशेष.