*खासदार बाळू धानोरकर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी*
चंद्रपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला राज्यघटना लाभली. त्यांच्यामुळे आपल्याला मोठी संवैधानिक पदे देखील प्राप्त करता आली. समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचे शिक्षण घेता आले. परंतु आधुनिक भारतात आपण जीवन जगात असताना आजच्या पिढीला किंवा एकूणच भारतीयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरंच कळले काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो.आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीचे त्यांचे कार्य भारतीय जनतेला न कळल्यामुळे भारतीयांची हानीच झालेली आहे.त्यामुळे आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आपल्या अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व कार्य शिकविले जाणे आवश्यक आहे.म्हणून इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात, विशेषतः बालभारती तसेच युवक भारतीच्या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र शिकविण्यात यावे अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केलेली आहे.
या पत्राच्या माध्यमातून त्यांनी खालील बाबींचा अभ्यासक्रमात प्रामुख्याने समावेश करावा अशी देखील विनंती केली आहे. त्यात डॉ. बाबासाहेबांचे चरित्र, ऐतिहासिक कार्य, विविध क्षेत्रातील संघर्ष, सशक्त भारत निर्मितीसाठीचे कार्य, महिलांच्या उन्नतीसाठी योगदान, ल़ोकशाही मजबुतीसाठी योगदान, तळागाळातील घटकांसाठीचे योगदान, आधुनिक भारत निर्मितीसाठी धरण निर्मिती, उद्योग व शेतीसाठी पाण्याचे नियोजन, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी संघर्ष,भारतीय संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचे योगदान व आपले संविधान,डॉ. बाबासाहेबांचे समाज सुधारणाविषयक विचार, आर्थिक सुधारणा विषयक विचार तसेच अन्य विषयांचा समावेश शालेय पुस्तकात कराव. बालभारती तसेच इतिहासाच्या पुस्तकात अनिवार्यपणे त्याचा समावेश व्हावा.आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे अशी रास्त मागणी केलेली आहे.