कोविड संरक्षणासाठी लसीकरण अनिवार्य
जिल्ह्यातील लसीकरणाची संख्या - 11 लाख 81 हजार
प्रिकॉशन डोस घेणाऱ्याची टक्केवारी केवळ 11.45
शासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे आवाहन
अधिकाऱ्यांनी खातरजमा करावी
नागपूर,दि. 01 : जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी कोविडच्या संभाव्य प्रसारापासून सुरक्षित रहावे, या दृष्टीने सर्व विभाग व अधिनस्त कार्यरत कर्मचारी त्यांचे कुटुंबीय व जवळचे नातेवाईक यांनी प्रतिबंधात्मक लस घेतली किंवा नाही याबाबत विभाग प्रमुखांनी किंवा अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी यांनी खातरजमा करावी व नसल्यास त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
सन 2019 पासून जगात कोविड-19 च्या गंभीर आजाराची साथ सुरु झालेली आहे, जिल्ह्यात आजतागायत 5 लाख 86 हजार 420 रुग्ण आढळलेले असून कोविड लसीकरण सुरु होण्यापूर्वी जिल्ह्याचा मृत्यू दर व आजाराच्या गंभीरपणाचे प्रमाण हे कोविड लसीकरण सरु झाल्यानंतर अत्यल्प झाल्याचे आढळून येते. 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तसेच 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव अंतर्गत नि:शुल्क लसीकरण सुरु आहे. तथापि अद्यापही जिल्ह्यात दुसरा डोस घेतलेले 11 लाख 81 हजार 303 म्हणजेच 68.88 नागरिक आहेत. तसेच प्रिकॉशन डोस मात्रा मिळालेल्या लोकांची संख्या अत्यल्प म्हणजेच 11.45 असून ही अत्यंत गंभीर बाब आहे.
आज रोजी जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण सत्राच्या माध्यमातून 12 वर्ष वयावरील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध असूनही काही शासकीय अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी अद्याप लस घेतली नसल्याचे आढळून आले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.