आमदार किशोर जोरगेवार यांची चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांची मागणी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने चंद्रपूरची दीक्षाभूमी पवित्र झाली आहे. नागपूर नंतर चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा दिली. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झाला. मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी उपेक्षीतच राहिली. या दीक्षाभूमीचा अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामुळे नागपूरच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचाही विकास व्हावा, अशी मागणी चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पुरवणी मागणीवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांची मागणी केली असून येथे संविधान भवनाची निर्मिती करण्याचीही मागणी यावेळी त्यांनी केली आहे. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या अधिवेशनातही हा विषय त्यांनी लाऊन धरला होता.