आढळराव पाटलांचा शिवसेनेला अखेर 'जय महाराष्ट्र', एकनाथ शिंदेंच्या गटात दाखल, शिंदे गटात पुन्हा उपनेतेपदी निवड,
आता खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये आलो आहे. भाजपा बरोबर सत्ता असल्याने जनतेची कामे करता येईल : आढळराव
जुन्नर : शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून त्यांची नवीन कार्यकारिणीत उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हकालपट्टीच्या अपमानाचे त्यांनी उट्टे काढले आहे. "आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू," अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे.
तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी समाज माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र काही वेळेतच नजरचुकीने हा प्रकार झाल्याचे सांगून शिवसेनेने कारवाई मागे घेतली होती. तेव्हापासून आढळराव पाटील नाराज होते. ते शिवसेनेत थांबणार की, शिंदे गटात जाणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये आढळराव पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी सभेची बैठक झाली असून त्या कार्यकारणीत माझा समावेश आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात विभागवाईज सर्व नियोजन करणार आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू. आता खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये आलो आहे. मागील तीन वर्ष सत्ता असून काहीच उपयोग झाला नाही. आता भाजपा बरोबर असल्याने जनतेची कामे करता येईल व विकासाला चालना मिळेल", अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे.
#shivsena #maharashtra #mumbai #bjp #uddhavthackeray #india #marathi #balasahebthackeray #yuvasena #ncp #sharadpawar #congress #pune #narendramodi #ajitpawar #adityathackeray #maratha #politics #rajthackeray #ig #saheb #sharadpawarspeaks #supriyasule #mns #hindu #modi #balasaheb #yuvashivsena #aadityathackeray #thackeray