विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर संशोधन करणारे जागतिक कीर्तीचे शेतकरी धोरण शास्त्रज्ञ तथा लेखक शशांक कुलकर्णी यांच्या 'समन्वयातून समग्रतेकडे' या पुस्तकाची महाराष्ट्र सरकारच्या 'शासनमान्य ग्रंथांच्या यादीत ' निवड झाली आहे. या पुस्तकाची निवड ' अध्यात्म व तत्त्वज्ञान' या प्रकारात झाली आहे. ही यादी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचलनालयामार्फत तयार करण्यात येते. ग्रंथ निवड समितीमध्ये वीस मान्यवरांचा समावेश होता. या समितीचे अध्यक्ष प्रताप कसबे व सदस्य सचिव ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले होत्या.
या पुस्तकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र मुळे यांची प्रस्तावना लाभली आहे. तसेच रामकृष्ण मठ, पुणे चे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद व एस एन डी टी विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मानसी राजहंस यांचे शुभेच्छा संदेश लाभले आहेत. पुणे येथील नामवंत नाविन्य प्रकाशनाने हे पुस्तक सन 2020 साली प्रकाशित केले आहे. या पुस्तकास यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद ( शाखा पलूस) यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शशांक कुलकर्णी हे प्रख्यात कवी, लेखक, वक्ता आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी धोरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म १९९० साली महाराष्ट्रातील साखराळे (जिल्हा सांगली) गावात झाला. त्यांनी जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनीती आणि लोक प्रशासन विभागात विद्यापीठ अनुदान आयोगाचा वरिष्ठ संशोधक म्हणून विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी जगातील विविध देशांनी त्यांचा गौरव केला आहे. विविध विषयांवर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये दहाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमधून लेखन केले आहे. पूज्य द्वारकानाथ शास्त्री राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना 'बाबा लक्ष्मण दास राष्ट्रीय स्मारक निर्माण सेवा समितीचे प्रणेता म्हणूनही ओळखले जाते, ही जम्मू आणि काश्मीरची एक अभिनव सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे. भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध स्वाहिली विद्यापीठाने त्यांना सन्मानित केले आहे.