: देशाला जागतिक स्तरावर कणखर बनविण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबर कौशल्य विकास शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक विकास करणे गरजेचे आहे. शालेय वयात मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच शारीरिक विकास साधने अत्यंत गरजेचे असून कोरोना काळात मुले अधिक काळ घरात राहिल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर व शारीरिक विकासावर ताण निर्माण झालेला आहे, शाळा चालू झाल्यानंतर हा ताण कमी करण्यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम घेणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर जास्तीत जास्त क्रीडांगण उपलब्ध करून देणे व त्यातून त्यांची शारीरिक क्षमता वाढविणे महत्त्वाचे राहील. क्रीडांगण शारीरिक विकासाचे केंद्र बनण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
त्या भद्रावती येथील भद्रावती येथे तालुका क्रीडा संकुल येथे बहुउद्देशीय हॉल मध्ये बॅडमिंटन फ्लोरिंग मॅट व क्रीडांगणावर खेळाडूसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या दोन्ही कामाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी नगराध्यक्ष भद्रावती अनिल धानोरकर, तहसीलदार अनिकेत सोनवणे, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदूरकर, गट विकास अधिकारी मंगेश आरेवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, उपविभागीय अभियंता आर. आर. मत्ते, जेष्ठ क्रीडा संघटक डॉ. बी. प्रेमचंद, महासचिव डॉ. राकेश तिवारी, सदस्य सचिव तालुका क्रीडा संकुल समिती विजय डोबाळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, भद्रावती - वरोरा विधानसभेत महिला आमदार म्हणून मी काम करीत आहे. या भागातील महिला सर्वच क्षेत्रात अव्वल ठराव्या त्याकरिता महिलांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या भागातील महिलांना येणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.