नवेगावबांध दि.१८ जून:-
अर्जुनीमोर तालुक्यात सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे गेल्या काळात पाच शेतकरी आत्महत्या झाल्या.या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहायता निधी मधून शासनातर्फे मदत देण्यात आली.तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या विधवांना धनादेशाचे वितरण तहसील कार्यालयात करण्यात आले. तालुक्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यामध्ये सावरटोला येथील आसाराम तुकाराम चचाणे,कानोली येथील मोरेश्वर पंढरी रहिले,परसटोला येथील परसराम येशू हलामी, केशोरी येथील संतोष दयाराम मानकर आणि एरंडी येथील यशवंत बारकू राऊत या शेतकऱ्यांचा समावेश आहे.राज्य शासनाकडून मासिक बचत योजनेच्या माध्यमातून ७० हजार रुपये आणि ३० हजार रुपयांचा धनादेश या स्वरुपात मृतकांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची सहायता मंजूर झाली. या सहायता निधीचे वाटप तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या हस्ते मृतांच्या वारसांना तहसील कार्यालयात वाटप करण्यात आले.यावेळी मृतकांची वारसान शारदा चचाने,सुनीता रहिले,गीता हलामी, वंदना मानकर आणि सुमित्रा राऊत उपस्थित होते.