संजीव बडोले प्रतिनिधी
नवेगावबांध दि.११ जून:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील रेल्वे स्टेशन वडेगाव ते अरुणनगर रेल्वेमार्गावर वनविभागाच्या कोरंबी बीटात कक्ष क्रमांक 260 राखीव वनामधील कोरंबी ते चारभट्टी डांबर रोड परिसरातील बल्हारशहा ते गोंदिया रेल्वे मार्गावरील रुळालगत वन्य प्राणी वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना दिनांक 11 जून ला सकाळी दहा वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. ही घटना सर्वप्रथम अरुणनगर येथील रेल्वे विभागाचे कर्मचारी गोविंदप्रसाद यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी-मोर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. खोबरागडे, वडेगाव स्टेशन क्षेत्र सहाय्यक डब्ल्यू.एम.वेलतुरे तसेच उपवनसंरक्षक गोंदिया कुलराजसिंग, नवेगावबांधचे प्रकानिष्कासन अधिकारी डी.व्ही. राऊत, मानद वन्यजीव रक्षक गोंदिया मुकुंद धुर्वे, रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक विजय मालेकर या सर्व अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.सदर मृत वाघ हा वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे अनुसूची क्रमांक एक भाग एक मधील असून,मोका पंचनामा करून पुढील कार्यवाही राष्ट्रीय व्यघ्र प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार केली जाणार आहे. वाघाच्या नाकातुन रक्तस्त्राव येत होता. तसेच कंबर व मागील डाव्या पायाची मांडी मोडलेली व शरीरावर मागील बाजूस खरचटल्याच्या खुणा दिसून आल्या असून मृत वाघाचे सर्व अवयव साबुत असल्याचे दिसून आले. अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. ही दुर्घटना काल रात्री च्या सुमारास घडली असावी,असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या मार्गावरून रात्रभर रेल्वे माल गाड्यांची वाहतूक सुरू असते.