अर्जुनीमोर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व लोकप्रतिनिधींचा होणार सत्कार.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ एप्रिल:-
स्वर्गीय प्रा. श्याम ठवरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त दिनांक २३ एप्रिल शनिवार ला सकाळी ११.०० वाजता प्रा. श्याम ठवरे युवा फाउंडेशन कार्यालयाचे उद्घाटन व धाबेटकडी पवनी यासारख्या दुर्गम व आदिवासी नक्षलग्रस्त परिसरातील गरजू रुग्णांना वेळीच मदत व्हावी. या उद्देशाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन धाबेटेकडी पवनी येथे स्वर्गीय प्रा. श्याम ठवरे युवा फाउंडेशन व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. दुपारी १२.०० वाजता द्वितीय पुण्यस्मरण मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती ,जिल्हा परिषद सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.
या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले हे भूषविणार आहेत. यावेळी ऑडिटर पी.बी.फुंडे भंडारा,एड. दिलीप कातोरे साकोली, सेवानिवृत्त प्राचार्य होमराज कापगते साकोली हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्री अध्यात्म गुरुकुल,गुरुकुंज मोझरी अमरावतीचे संचालक रविदादा मानव स्त्री पुरुष समानता व सर्व धर्म समभाव या विषयावर,प्रा.नरेश आंबीलकर रामटेक हे व्यसनाधीनता- युवा पिढीसाठी एक शाप, सिहोरा येथील प्राचार्य ओ. बी. गायधने हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५.०० वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
रात्री ७.०० वाजता झी युवा संगीत सम्राट फेम युवा शिवशाहीर रामानंद उगले आणि संच जालना यांचा महाराष्ट्राची लोकगाणी आणि लोककला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरीपण स्वर्गीय प्रा. श्याम ठवरे पुण्यस्मरण कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन, फाउंडेशनच्या व मित्र परिवाराच्या वतीने पंचायत समिती सदस्य चंद्रकलाताई श्याम ठवरे, डॉ. राहूल ठवरे यांनी केले आहे.