भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्यांतर्फे नुकताच निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण क्षेत्रातील नामवंत प्रा. धनराज आस्वले, नागोबा बहादे, प्रकाश सातपुते, डॉ. विजय टोंगे, डॉ. सुधीर आष्टुनकर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य उमाटे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगाराच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रा.आस्वले यांनी तीनही शाखेतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे जाहीर केली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिनत पठाण, आरती श्रावणे, कल्याणी गायकवाड व दिनेश धारा या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र लांबट, प्रास्ताविक प्रा.आर.डी. मालेकर व आभारप्रदर्शन प्रा.के.एन. कापगते यांनी मानले. कार्यक्रमाला कला, विज्ञान व एमसीव्हीसी शाखेतील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.