स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांचे मनपा आयुक्तांना निर्देश
कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता करावरील शास्ती माफ करावी, असे निर्देश स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना दिलेत. ३१ जानेवारी २०२२पर्यंत कर भरणाऱ्यांना ही सवलत देण्यात यावी, असेही सूचित केले आहे. ही शास्ती माफ झाल्यास शहरातील थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मागील २ वर्षात कोरोना विषाणूमुळे उदभवलेली परिस्थिती अत्यंत भयानक आहे. मागील वर्षी संचारबंदी लागल्याने अनेक नागरिकांचे रोजगाराचे साधन बंद झाले होते. अशा परिस्थितीत कर भरणे अनेकांना शक्य झाले नाही. अशा मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी शास्ती करात माफ करण्याचे निर्देश दिले. कर भरणा करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात यावी, या मुदतीत कर भरणा करणाऱ्यांना शास्ती (व्याज) माफ करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना सभापती संदीप आवारी यांनी आयुक्तांना केली.