चंद्रपूर : तीन दशकांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अग्रस्थानी असलेल्या तेली समाजाला सक्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान नाही. त्यामुळे समाजहितासाठी आता समाजबांधवांची एकजूट महत्त्वाची असून, समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून समाजबांधवांनी एकत्र येत प्रत्येक क्षेत्रातच आपले अढळ स्थान निर्माण करावे, असे आवाहन विदर्भ तेली समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष गोविल मेहरकुरे यांनी केले.
चंद्रपूर लगतच्या दाताळा परिसरात नुकतीच समाज जोडो अभियानाच्या अनुषंगाने तेली समाजाची चिंतन बैठक पार पडली. या चिंतन बैठकीत चंद्रपूर सह जिल्ह्यातील समाजातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी अनेकांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी बोलताना मेहरकुरे यांनी समाजाचा विकास हाच प्रत्येक समाजबांधवाने दृष्टीकोन ठेवला पाहिजे. एकमेकांसाठी प्रत्येकच क्षेत्रात ताकद उभी केली पाहिजे. तरच या समाजाचे अस्तित्व कायम राहील, अन्यथा हा समाज नेहमी दुर्लक्षितच राहणार असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.
याच चिंतन बैठकीत तेली समाजाचे ज्येष्ठ नेते प्रा. सूर्यकांत खनके, समाजाचे ज्येष्ठ नेते प्रकाश देवतळे, सामाजिक कार्यकर्ते अजय वैरागडे यांनीही आता समाजबांधवांची वज्रमूठ होणे आवश्यक असल्याचे विचार व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक आकाश साखरकर, माजी नगरसेवक रवींद्र जुमडे, प्रा. बेले, प्रा. वरभे, शैलेश जुमडे, निलेश बेलखेडे, नितेश जुमडे, शेखर वाढई, जितू ईटनकर, राजेंद्र रघाताटे, सचिन कुंभलकर, रवी लोणकर, विनोद कावळे, अनिल आंबोरकर, राजेश बेले, रामदास बावनकर, अनिल तपासे, सुरेश भुते, नंदू येरणे, गणेश येरणे, कपिल वैरागडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.
भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये तेली समाजाने तेली समाजाच्याच व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, तेव्हाच राजकारणात हा समाज मोठी झेप घेवू शकतो. आजघडीला राजकीयदृष्ट्या विखुरलेल्या या समाजाचे एकत्रिकरण होणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणासह प्रत्येकच क्षेत्रात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या समाजाचा ज्येष्ठ व युवकांनी पुढे येवून समाज जोडो अभियान प्रभाविपणे राबवून समाजाला एकत्र करण्याची गरजही आहे. यावेळी इतरही समाजबांधवांनी आपले विचार व्यक्त करून समाजाला एकत्रित होण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखीत केली. भविष्यात या अभियानाच्या माध्यमातून अशाचप्रकारच्या चिंतन बैठका घेण्याचेही ठरविण्यात आले.