शहरातील ८ कोव्हॅक्सिन केंद्रावर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणा
चंद्रपूर | शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शनिवार दिनांक १ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून, प्रत्यक्षात लसीकरण सोमवार, दिनांक ३ तारखेपासून होणार आहे. यासाठी शहरातील ८ कोव्हॅक्सिन केंद्र राखीव राहणार आहेत.
चंद्रपूर शहरात मागील १६ जानेवारी २०२१ पासून कोविड१९ लसीकरणाला सुरुवात झाली. ९५ टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून, सुमारे ६२ टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण वाढविण्यासाठी ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी ८ कोवॅक्सीन केंद्र राखीव राहणार आहेत. १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी पहिला डोस देण्यात येणार असून, फक्त ऑनलाईन पद्धतीने येणाऱ्यांना प्राधान्य राहील. १५ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी एनयुएलएम ऑफिस ज्युबिली हायस्कूलसमोर, शासकीय आयटीआय वरोरा नाका चौक, जिल्हा रुग्णालय, एरिया हॉस्पीटल लालपेठ, रवींद्रनाथ टागोर मनपा शाळा विठ्ठल मंदिर वॉर्ड, पंजाब सेवा समिती विवेकनगर, झाकीर हुसेन स्कुल सवारी बंगलाजवळ दादमहल, पोद्दार कॉन्व्हेन्ट अष्टभुजा वॉर्ड आदी केंद्राचा समावेश आहे.