सदस्यत्व रद्द करण्याची किशोर तरोणे यांची मागणी.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२७.
अर्जुनीमोरगाव तालुक्यातील मौजा सावरटोला ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्याने गोठाण जागे वर अतिक्रमण केले आहे. ही कृती नियमबाह्य आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य डॅनी महादेव डोये यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे.अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य डॅनी महादेव डोये यांनी सचिवाशी परस्पर संगणमत करून, ग्रामपंचायत व गावकऱ्यांना अंधारात ठेवून, सदर गट आपल्या नावे करून ग्रामपंचायत नमुना ८ तयार केला व सदर जमिनीवर सदर ग्रामपंचायत सदस्याचे भाऊ गजानन व स्वतः सदस्य डॅनी डोये असे दोन अतिक्रमण करून, घराचे बांधकाम सुरू केले आहे. मौजा सावरटोला येथिल तहसील साजा क्रमांक २८ मधील, गट क्रमांक ४ हे निस्तार पत्रकानुसार गोठाण गाई थांबवण्याची जागा याकरिता राखीव आहे. ग्रामपंचायत मध्ये कुठलाही ठराव न घेता मालमत्ता क्रमांक ३०१ या नावाने हे अतिक्रमण दर्ज करण्यात आले आहे. याबाबत सदर प्रकरणाची माहिती गावकर्यांना असून ग्रामपंचायत सदस्य डॅनी डोये यांनी केलेले अतिक्रमण त्वरित काढून, गोठाणाची जागा मोकळी करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. सदर प्रकरणाबाबत किशोर तरोणे यांनी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना २६ ऑगस्ट २०२१ रोजी तक्रार केली आहे.तसेच ग्रामपंचायत सावरटोला,तहसीलदार, खंडविकास अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना लेखी निवेदन देऊन गोठाण च्या जागेवरील असलेले अतिक्रमण व बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे .गोठाण ची जागा गावकऱ्यांना मोकळी करून द्यावी. अशी मागणी केली आहे. परंतु संबंधितांना निवेदन देऊन तीन महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी अजून पर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत .सदर प्रकरणाची तक्रार करून माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने यांनी विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे दाद मागण्यात येईल. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
----
कोट-
ग्रामपंचायत सदस्य असताना आपण कुठलेही अतिक्रमण केले नाही. पूर्ण गावच अतिक्रमणात आहे. सदर जागा वडिलांनी माझ्या नावे केली आहे. १९७० पासून सदर जागा नमुना ८ मध्ये आहे. त्यामुळे सचिवाशी संगणमत करून सदर जागा नमुना ८ मध्ये केली आहे, हा आरोप खोटा आहे.
-डॅनी महादेव डोये,
ग्रामपंचायत सदस्य, सावरटोला.
---–----