शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी युवती प्रमुख कार्यकर्तीला अटक करण्यात आली आहे. वाहन चोरीसाठी ही युवती दोन साथीदारांच्या मदतीने विशिष्ट पद्धत वापरत असे. गर्दीच्या ठिकाणाहून ही विशिष्ट पद्धत वापरून या युवतीने मित्रांच्या सोबत अनेक गाड्या पळवल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने या तिघांचे कृत्य पकडले असून या प्रकरणी राष्ट्रवादी युवती कार्यकर्ती वैष्णवी देवतळे सह मनीष पाल आणि सौरभ चंदनखेडे अशा तीन आरोपींना कोठडी देण्यात आली आहे.
या युवतीला राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या महिन्यातच निलंबित केले होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूरचे जिल्ह्याध्यक्ष राजीव कक्कड यांनी केला आहे.
अशी करायची चोरी
दुचाकीच्या हँडलला लॉक नसल्याचे पाहून ती आपल्या साथीदारासह दुचाकी चोरायची. ही युवती अशा गाड्यांवर बसून दूरपर्यंत ती ढकलत नेत असे. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने गाडी निर्जनस्थळी नेत असत. मेकॅनिक साथीदारांच्या मदतीने गाडी सुरु करून तिची विक्री केली जात असे.
एक व्यक्ती संशयास्पदरित्या दुचाकीची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. म्हणजेच 50 ते 70 हजार रुपयांची दुचाकी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये विकत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्या व्यक्तीला पकडल्यावर ही माहिती उघड झाली. यातील वैष्णवी देवतळे ही आरोपी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारी असल्याचं स्पष्ट झालं."
नंबरप्लेट तयार करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या दुचाकीचा आधार घ्यायचे. म्हणजेच एखाद्या कंपनीची पांढरी दुचाकी चोरली की त्याच कंपनीच्या दुसऱ्या एका पांढऱ्या दुचाकीचा नंबर या चोरलेल्या दुचाकीला द्यायचे अशी माहिती पोलिसांनी दिली
या गुन्हयात आरोपींकडून रामनगर पोलीस स्थानक येथील एकूण 5 गाडया चंद्रपूर शहर पोलीस स्थान येथील 3 गाड्या, बल्लारशा पोलीस स्थानक येथील 1 गाडी तसेच इतर 2 दुचाकी वाहन अशा एकूण 11 दुचाकी मोपेड गाड्या अंदाजे किंमत एकूण 6,30,000/- रू. चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सपोनी जितेन्द्र बोबडे, पो.उप नि. सचिन गदादे, पो. हवा. संजय आतकुलवार, पो. कॉ. नितीन रायपूरे, गोपाल आतकूलवार, कुंदन बावरी, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो. शि. अपर्णा मानकर यांच्या पथकाने केली.
या युवतीची पक्षाने गेल्या महिन्यातच हकालपट्टी केली आहे अशी माहिती चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.
"संबंधित युवती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती पण तिला पक्षाने 20 ऑक्टोबर 2021 रोजी निलंबित केले होते.
वारंवार सूचना देऊन देखील पक्षशिस्त न पाळणे, तसेच पक्षाच्या विरोधात कारवाई करणे यास्तव आपल्याला संघटनेतून निलंबित करण्यात येत आहे," असे पत्र तिला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी 20 ऑक्टोबर रोजी दिले होते.