सज्जन शक्तीने संघ कार्यात सहाभागी व्हावे : संजय गुळवे यांचे प्रतिपादन
रा. स्वं. संघाच्या चंद्रपूर नगर शाखेचा विजयादशमी उत्सव
चंद्रपूर, 17 ऑक्टोबर
आज भारता समोर अनेक आव्हान आहेत. आपल्या सिमेवर चिनचे सैन्य दिसत आहे. उद्योग क्षेत्रातही चीनचे शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत संघ कार्यात सज्जन शक्ती एकत्र होऊन देशाच्या सेवेत समर्पण द्यावे. नगराच्या सर्व वस्त्यांमध्ये संघाच्या शाखेची स्थापना करून सज्जन शक्ती एकत्रित करा व या शक्तीला संघ कार्यात सहभागी करून देशाला परमवैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सह प्रचार प्रमुख संजय गुळवे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर नगर शाखेचा विजयादशमी उत्सव रविवार, 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी येथील जिल्हा क्रीडा संकुलाजवळील लोकमान्य टिळक विद्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी नगर संघचालक ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. रवींद्र भागवत, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार व्यासपीठावर उपस्थित होते.
गुळवे म्हणाले, एक हजार वर्षाच्या गुलामगिरीत हिंदू धर्मावर अनेक अत्याचार झालेत. अनेकांचे धर्मांतरण झाले. त्यामुळे हिंदू आपला गौरवशाली इतिहास विसरला होता. विस्मृतीत गेलेल्या हिंदू समाजाला जागे करण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि दोन वर्षातच हिंदू संस्कृतीचे जागरण झाले. आज शाखेच्या माध्यमातून संस्कारित मानव निर्मितीचे कार्य सुरू आहे. देशावर आलेल्या कठीण प्रसंगात नेहमी संघाचे स्वंयसेवक धावून जात आहे. ही शक्ती वाढविण्यासाठी नगराच्या प्रत्येक वस्त्यांमध्ये संघाची शाखा सुरु करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रम कोरोना संदर्भातील पूर्ण नियम पाळून घेण्यात आला. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम न करता संख्येची मर्यादा लक्षात घेता एक मुख्य कार्यक्रम घेऊन त्याचे आभासी पद्धतीने प्रसारण शहरात अन्य दोन ठिकाणी स्वयंसेवकांना मार्गदर्शन ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व आभार अॅड. रवींद्र भागवत यांनी केले. तत्पूर्वी, ध्वजारोहण, प्रार्थना, सांघिक गीत, सुभाषित, अमृतवचन व वैयक्तिक गीत झाले. कार्यक्रमाला भारताचे माजी गृह राज्य मंत्री माजी खासदार हंसराज अहिर व राज्याचे माजी अर्थ मंत्री तथा विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते व यांच्यासह गणमान्य नागरिक तथा स्वयंसेवक उपस्थित होते.