देशात वाघाचे अस्तित्व याचे सर्व श्रेय व्याघ्र संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना जाते - संचालक रामानुजम
नवेगावबांध येथे टायगर फार इंडिया, रॅली ऑन व्हील चे जंगी स्वागत
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.4 ऑक्टोबर:-
वन्यजीव सप्ताह च्या प्रारंभी या रॅलीचे आगमन झाले आहे. व्याघ्र संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व सर्व कर्मचारी यांच्या प्रयत्न व जागरूकतेमुळे आज मीतिला देशात २२६७ वाघ आहेत. याचे सर्व श्रेय व्याघ्र संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना जाते. या रॅली पासून प्रेरणा घेऊन आणखी हे काम पुढे नेण्याचे आवाहन नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आर. एम. रामानुजम यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
ते भारत सरकारच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण नवी दिल्लीच्या वतीने टायगर फार इंडिया या उपक्रमांतर्गत रॅली ऑन व्हील च्या आगमना प्रसंगी नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प व नवेगाव राष्ट्रीय उद्यान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी 1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती उपयार्डात कार्यक्रमात बोलत होते. वनविभागाच्या रॅली ऑन व्हील चे जंगी स्वागत येथे करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आर. एम रामानुजम हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ताडोबा अंधेरी व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी एस. एस. भागवत,ए. एस. अग्रवाल सहसंचालक, प्रल्हाद यादव सहसंचालक अचानकमार व्याघ्र संरक्षण प्रकल्प छत्तीसगड, नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे उपसंचालक पुनम पाटे, दादा राऊत उपवनसंरक्षक वन विभाग प्रादेशिक, पी. एस. आत्राम, वनक्षेत्र अधिकारी एस. आर.मेश्राम, अजय कावरे,वाघ,मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे, रुपेश निंबार्ते, लोकपाल गाहणे, हिवराज राऊत, जयेश कापगते, रामदास बोरकर, संजीव बडोले यावेळी उपस्थित होते. आरंभी वृक्ष पूजा करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच वृक्ष भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
टायगर फार इंडिया अंतर्गत रॅली ऑन व्हील चा शुभारंभ 28 सप्टेंबरला छत्तीसगड राज्यातील जिल्हा मंगोली स्थित अचनकमर व्याघ्र संरक्षण प्रकल्पातून झाला. उदंती सीतानदी, गाझियाबाद, इंद्रावती बिजापूर, ताडोबा अंधेरी व्याघ्र संरक्षण प्रकल्प चंद्रपूर असा प्रवास करीत, ही रॅली नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान येथे १ आक्टोंबर वन्यजीव सप्ताहाच्या प्रसंगी पोहोचली. पेंच, बोर, व्याघ्रप्रकल्प असा प्रवास करीत या रॅलीचा समारोप अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे 6 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
दिवसेंदिवस देशातील वाघांची घटणारी संख्या हा चिंतनाचा विषय झाला आहे. आपण सर्व मिळूनच वाघांचे संरक्षण व संवर्धन करू शकतो. ही जबाबदारी आपल्या खांद्यावर असून, व्याघ्र संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधानाची भावना बाळगावी. सर्वांनी आत्मचिंतन करून जंगलाच्या, व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या प्रेमात माणसं पडावी. तरच आपण आपल्या कार्यात यशस्वी होऊ.
वन सेवेत काम करण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळाली. हे आपले भाग्य आहे.असे प्रतिपादन ताडोबा अंधेरी व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी एस. एस. भागवत यांनी केले.देशातील विविध व्याघ्र संरक्षण प्रकल्पात समन्वय साधावा, तेथील अडीअडचणीची जाणीव व्हावी, देशांतर्गत व्याघ्र संरक्षण प्रकल्पात समन्वय साधला जावा, प्रकल्पात काय वैविध्य आहे. याची आपसात माहिती व्हावी, प्रकल्पाअंतर्गत वैचारिक व व्यवस्थापनाच्या पातळीवर देवाण-घेवाण व्हावी. हा या रॅली ऑन व्हील चा उद्देश असल्याचे भागवत आपल्या भाषणात पुढे म्हणाले.व्याघ्र संरक्षण प्रकल्पात व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृतीवर जास्त भर दिला जाईल. असे आपल्या प्रास्ताविकातून नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या उपसंचालक पुनम पाटे यांनी मांडले.
व्याघ्र संरक्षण प्रकल्प, विशेष व्याघ्र संरक्षण दल, वन विभाग प्रादेशिक व राष्ट्रीय उद्यान च्या वतीने येथे रॅली काढण्यात आली.व्याघ्र संरक्षण ,वसुंधरा व पर्यावरण यांच्या संवर्धनाची जागृती, वन्य प्राण्यांचा गमती साठी होणारा छळ, पशुपक्षी यांचे संवर्धन, बदलणाऱ्या पर्यावरणाचे स्वरूप याविषयी विक्रम फडके आणि चमू यांच्या असर फाउंडेशन भंडारा च्या वतीने जनजागृतीपर कला पथकाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी व्याघ्र संरक्षण शपथ घेतली.नवेगाव राष्ट्रीय उद्यान राखीव चे वनक्षेत्र अधिकारी व या कार्यक्रमाचे आयोजक सचिन डोंगरवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक अरविंद बडगे यांनी केले.कार्यक्रमाला नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प,नवेगाव राष्ट्रीय उद्यान, विशेष व्याघ्र संरक्षण दल, वन विभाग प्रादेशिक चे सर्व अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.