राष्ट्रीय पोलीस शहीद दिनाचे कान्होली ,नवेगावबांध येथे आयोजन
संजीव बडोले / प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.21ऑक्टोबर:-
राष्ट्रीय पोलीस शहीद दिनानिमित्त गोंदिया पोलीस दलाच्या वतीने दिनांक 21 ऑक्टोंबर रोज गुरुवारला पोलीस ठाणे नवेगावबांध अंतर्गत मौजा कान्होली व नवेगावबांध येथे पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.,शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहीले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चीचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिंगनडोह गावाजवळील पुलावर 20 जानेवारी 2003 ला नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात कान्होली येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम राहिले हे शहीद झाले होते. 21 ऑक्टोबरला भारतात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृती जागवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने दरवर्षी शहीद दिन पाळला जातो.
गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर उपविभागीय पोलिस अधिकारी जालंधर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलिस दलाच्या वतीने मौजा कानोली येथील चौकात असलेल्या शहिद दीपक सखाराम रहीले पोलीस उपनिरीक्षक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, 2 मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाला शहिद दिपक रहिले यांचे मातोश्री सुभद्राबाई रहिले, त्यांच्या मोठ्या भगिनी लताबाई थेर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, प्राचार्य राठोड उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगावबांध येथेही पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शहिद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांच्या मातोश्री सुभद्राबाई राहिले त्यांच्या मोठ्या भगिनी लताबाई थेर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. ठाणेदार हेगडकर यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. ठाणेदार जनार्दन हेगडकर, प्राचार्य राठोड यांनी यावेळी आपल्या मनोगतातून शहिद पोलीस उपनिरीक्षक दीपक राहिले यांच्या बलिदाना विषयी स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका ए.आर. कुथिरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पोलीस हवालदार तुलावी यांनी मानले. कार्यक्रमाला कान्होली येथील गावकरी, विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी, गावकरी, आबालवृद्ध महिला-पुरुष नवेगावबांध पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.