आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग आणि एम.जी.एम. विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्न मंजुषा स्पर्धा
औरंगाबाद: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग आणि एम.जी.एम. विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्न मंजुषा स्पर्धा सुरु करण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्यात मंगळवारी आणि गुरुवारी ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत दर मंगळवारी आणि गुरुवारी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारीत होणाऱ्या सकाळी ७ वाजून १० मिनिटाच्या बातमीपत्रात एक प्रश्न विचारला जाईल. याचवेळी हा प्रश्न आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्तविभागाच्या ‘आकाशवाणी औरंगाबाद’ या फेसबुक पेजवर तसेच airnews_arngbad या ट्विटर अकाऊंटवर देखील विचारला जाईल. श्रोत्यांनी या प्रश्नाचे उत्तर quizmarathi@gmail.com या इ-मेलवर पाठवायचे आहेत. याशिवाय फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्ये देखील उत्तर देता येईल. सर्वात प्रथम अचूक उत्तर देणाऱ्याला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. इ-मेल, फेसबुक अणि ट्विटर अशा तिन्ही गटातून प्रत्येकी एकाची विजेता म्हणून निवड केली जाईल. विचारण्यात येणारे सर्व प्रश्न स्वातंत्र्य चळवळ तसेच स्वातंत्र्योत्तर भारतातील घटना आणि घडामोडींवर आधारित असतील.
ही प्रश्न मंजुषा स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. केवळ आकाशवाणी औरंगाबादमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. स्पर्धेत एकदा विजेतेपद मिळालेल्या स्पर्धकाला पुन्हा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
स्पर्धेचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या बातमीपत्रात घोषित केला जाईल. तसेच फेसबुक आणि ट्विटरवरही त्याची घोषणा केली जाईल.
स्पर्धेतील प्रत्येक विजेत्याला प्रमाणपत्र आणि एक पुस्तक सप्रेम भेट दिले जाईल. ही स्पर्धा वर्षभर सुरू राहणार आहे.
स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहन वृत्तविभाग आकाशवाणी औरंगाबाद आणि एम जी एम विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.