वरोरा : स्थानिक व्होल्टाज रेफ्रिजरेटर एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र अतकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने नुकताच सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरोरा येथील प्रसिद्ध साहित्यिक मदनराव ठेंगणे होते. व्यासपीठावर कामगार संघटनेचे महासचिव शरद ठेंगणे,माजी सहसचिव गजानन महानकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथराव नक्षिणे, कुसुमताई अतकर, सौ.शीतल अतकर, डॉ. यशवंत घुमे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सत्काराला उत्तर देताना अतकर यांनी सांगितले की, कामगार संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला अनेक अडचणी आल्यात. परंतु आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या अडचणींवर मात करीत मार्ग निघत गेले. कामे करताना काहीवेळा अपयशही आले. विशेषतः व्हिडीओकॉन व्यवस्थापनाशी तडजोडी करत असताना पाहिजे तसे यश मिळवू शकलो नाही. मात्र पुढील परिस्थितीवर मात करण्यासाठी आता सगळ्यांना तडजोड व एकजुटीशिवाय पर्याय नाही.अध्यक्षीय भाषणात मदन ठेंगणे यांनी सांगितले की, नरेंद्र अतकर हे कठोर परिश्रम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या परिश्रमाने व्होल्टाज कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला व पुढे सेवानिवृत्तीनंतरही ते प्रयत्न करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी कामगार संघटनेतील गजानन राऊत, बंडू कातोरे,अनिल सोमलकर यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन राहुल कळसकर, प्रास्तविक मधुकर वाटेकर, आभार नितीन नक्षीने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर उमरे, विजय भेंडे, चंदू मानकर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.