वनपरिक्षेत्र अधिकारी गलगट यांचा महाप्रताप
संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करा. आदिवासी संघटनांची मागणी
राजुरा/प्रतिनिधी दिनांक- 2/8/2021
राजुरा तालुक्यातील कविठपेठ येथील मोतीराम विठू आत्राम यांना रानटी डूकराने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा कुटुंब उघड्यावर पडला असून सदर घटनेला एक वर्ष होत आहे. वनविभागाने त्यांचे कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते मात्र तब्बल अकरा महिने नुकसान भरपाईचा प्रस्ताव वनपरिक्षेत्र कार्यालय राजुरा यांनी दडवून ठेवला असल्याने खडबड उडाली आहे.
पिढीत महिला साधना आत्राम यांनी वारंवार सदर कार्यालयात विचारणा केली त्यानंतर सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा यांनी दिली. मात्र उपविभागीय वन अधिकारी कार्यालय राजुरा यांनी विहित मुदतीत प्रस्ताव पाठविले नसून तब्बल अकरा महिन्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले असून हा शासन निर्णयाचा भंग असून शिस्त भंगाची कार्यवाही करण्यात का येऊ नये अशा आशयाचे पत्र वनपरिक्षेत्र अधिकारी गलगट यांना दिले आहे. मात्र गलगट अजूनही निलंबित झाले नसून गलगट यांचेवर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलल्या जात आहे. यामुळे मयत मोतीराम आत्राम यांची पत्नी गोंधळून गेली आहे.
साधना आत्राम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी गलगट यांना भेटून प्रकरणाची माहिती विचारली असता तिला उडवा उडविचे उत्तर देऊन परत पाठवीत आहेत तसेच मयत विठू आत्राम यांचा नुकसान भरपाईचा प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही. यावरू आर.एफ.ओ. गलगट यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
सदर बाब आदिवासी संघटनांच्या निदर्शनास आल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी व मयत मोतीराम विठू आत्राम यांच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली असून आदिवासी महिलेला नुकसान भरपाई न दिल्यास कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करू अशी माहिती आदिवासी कार्यकर्त्यांनी दिली असून न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असेही निवेदनात नमूद असून निवेदन उपविभागीय वन अधिकारी गर्कल यांनी स्वीकारले असून निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. मधुकर कोटणाके, घनश्याम मेश्राम, संतोष कुलमेथे, रमेश आडे, अभिलाष परचाके, योगेश कोडापे उपस्थित होते.