नागपूर दि. 16:- कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील मुलांचे पालकत्व हरवले आहे. काही कुटुंबात तर आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे. अशा कोरोनाकाळात पालकांच्या मृत्युमुळे अनाथ झालेल्या मुला मुलींची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडकाळात मृत्यू झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा कृती समितीची बैठक आज झाली. या बैठकीला महिला व बाल संरक्षण अधिकारी अपर्णा कोल्हे, बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बालहक्क समितीचे अध्यक्ष राजू थोरात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक प्रकाश कांचनवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे उपस्थित होते.
सद्यस्थितीत जिल्हयात दोन्ही पालक गमावलेली एकूण 25 मुले आहेत. एक पालक गमावलेली एकूण 575 बालके सापडली आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या 16 बालकांच्या घरी भेटी देऊन सामाजिक तपासणी अहवाल तयार करण्यात आला आहे. इतर दोन्ही पालक व एक पालक गमावलेल्या बालकांचा तपासणी अहवाल सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी श्रीमती कोल्हे यांनी दिली.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची देखभाल करणारे नातेवाईकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची माहिती घेवून त्याची नोंद सामाजिक तपासणी अहवालात घेतली पाहिजे,अशी सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी केली. यावेळी कोरोना कालावधीत विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत ही चर्चा झाली.