मुंबई: शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या मुलांनी त्यांच्या दोन्ही पालकांना गमावलं आहे त्यांच्या पहिली ते बारावीच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आग्रही आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.
लवकरच शासन निर्णय निघण्याची शक्यता
शालेय शिक्षण विभागाला या निर्णयासाठी प्रस्ताव आवश्यक निधीसह मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय होऊन जीआर निघण्याची दाट शक्यता असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. ज्या मुलांनी दोन्ही पालकांना गमवालं त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च शासनाकडून करण्याची तयारी शिक्षण विभागानं केली आहे.