चंद्रपूर शहरात सात नव्या पॉझिटिव्ह रुग्णांसह केवळ ७६ रुग्णसंख्या
चंद्रपूर, ता. २५ : महानगर पालिका हद्दीत मागील २४ तासांत २९० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यात सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता एकूण ७६ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ५९ रुग्ण गृहविलगीकरणात, ६ जण खासगी रुग्णालयात तर ११ जण मनपा कोव्हीड रुग्णालय आणि केअर सेंटरमध्ये भरती आहेत. शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून, बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेत न राहता काळजी घेण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
वर्षभरात कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून दोन लाख ४३ हजार ३७० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख १७ हजार ९१५ जण निगेटिव्ह निघालेत. उर्वरित २५ हजार ४५५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २४ हजार ९५४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरात एक जूनपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटली, हे विशेष. दरम्यान, गत वर्षभरात कोव्हीडमुळे ४२५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील आठवडाभरापासून मृत्यूचा आकडा स्थिर आहे. सध्या कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.