नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा 26 की 28 जूनला सुरू होणार?
शाळा भरविण्याच्या वेळेबाबत संभ्रम दूर करण्याची मनसे शिक्षक सेनेची मागणी
नागपूर- राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात 15 जून रोजी शाळा (शिक्षक शाळेत- विद्यार्थी घरी) सुरू करण्यात आल्या आहेत आणि येत्या 28 जून पासून विदर्भातील शाळा सुरू करण्याचे निर्देश आहेत.
परंतु नागपूर जिप च्या सुट्यांचा परिपत्रकानुसार उन्हाळी सुट्यां 25 जून रोजी संपत असल्याने दि.26 जून रोजी शाळा सुरू करण्याचे निर्देश आहेत.
सेवा व शिस्त अपील नियमानुसार दीर्घ सुट्यांचा पूर्वी व दीर्घ सुट्यांचा नंतर शाळेत उपस्थित राहणे शिक्षकांना आवश्यक आहे अन्यथा वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वेगवेगळ्या दिनांकामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
*शाळा सकाळी की दुपारी संभ्रमाचे वातावरण*
राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा 28 जून रोजी सुरू करण्याचे आदेश आहेत मात्र शाळेची वेळ नमूद करण्यात आलेली नसल्याने शाळा कार्यालयीन वेळेत (10.00 ते 5.00) गृहीत धरण्यात येत आहे तर नागपूर जिप च्या सुट्यांचा परिपत्रकात दि.26 जून पासून 5 जुलै पर्यंत सकाळ पाळीत (7.30 ते 11.30) शाळा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा भरविण्याचा (शिक्षक उपस्थितीचा) जिप शिक्षण विभागाने स्वयंस्पष्ट आदेश काढून संभ्रम दूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे पदाधिकारी सर्वश्री शरद भांडारकर, संजय चामट व मनोज घोडके यांनी केली आहे.