मंगेश दाढे
नागपूर : करोनानंतर उदभवलेल्या ‘म्युकॉरमायकोसिस’ आजारावर प्रभावी औषधांची माहिती द्यावी,असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज सोमवारी राज्य सरकारला दिल्या.
स्वतः हुन न्यायालयाने जनहित याचिका दाखल केली आहे. तर, अनेकांनी मध्यस्थी अर्ज दाखल केले असून कोरोना रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावी, अशी विनंती केली आहे. मध्यस्थी अर्ज करणारे वकील अनिल कुमार यांनी कोरोनानंतर ‘म्युकॉरमायकोसिस’ आजार कशाप्रकारे वाढत आहे, ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. या रोगावर नियंत्रणासाठी औषधांचा तुटवडा आहे. पण, केंद्र किंवा राज्य सरकारच्या या आजाराविषयी कोणते दिशानिर्देश आहेत, याबाबत अनभिज्ञ आहोत, असे न्यायालयाने सांगितले. आम्हाला याबाबत राज्य सरकारने माहिती दिल्यास सहकार्य करता येईल, अशी भूमिका न्यायालयाने घेतली. त्यावर अन्य मध्यस्थी अर्ज दाखल करणाऱ्यांनीही माहिती द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
'ऑक्सिजन'साठी रुग्णालयांनी घ्यावा पुढाकार
नागपूर शहरातील फक्त दोन रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, अन्य रुग्णालयांनी यावर गांभीर्य दाखविलेले नाही, याकडे न्यायाललयाने लक्ष वेधले. तर, खासगी सामाजिक दायित्व (सीएसआर) फंडातून वेकोली, मॉईलने दिलेल्या निधीवर सुनावणी बुधवारी (19 मे) होणार आहे.