बुद्ध हा विचार. सुखकर जीवन जगण्याचा मार्ग. द्वेषाने द्वेष वाढतं. प्रेमाणं जग जिंकता येतं. हे बुध्द वचन. केवळ उपदेश नाही. तथागतांनी पायी भ्रमण केलं. जग पालथा घातला. आपल्या विचारांचा प्रभाव सव्वाशेवर राष्ट्रांवर सोडला. धम्म प्रचाराने ते जागतिक पहिले लोककल्याणकारी महामानव ठरले. त्यांचे विचार जगणं सुखकर करतं. हा आशय BUDDHA ON HAPPINESS या इंग्रजी पुस्तकातून मांडला.
लेखक डॉ. के. पी. वासनिक. ते वैदर्भिय. कृषी खात्यात लागले. कृषीवर पुस्तकं लिहिली. केंद्र सरकारात कृषी सचिव पदापर्यंत गेले. दिल्लीत स्थायी झाले. देशाच्या राजधानीत तेवढेच सक्रीय. देश-विदेशात ओळखी. त्यांची बुध्दाबाबत उत्सुकता. भेटीत प्रश्नांची सरबती होत असे. मौखिक उत्तरे देत. त्यातून बुध्दावर लिहावासं वाटलं. त्यांच्या उत्सुकतेच्या पुर्ततेसाठी अडीचशे पानांचं पुस्तक लिहलं. पुस्तक Amazonने पाठवलं. या पुस्तकावर लिहावं. ही अपेक्षा. त्यामुळे पुस्तक वाचणं आलं. पुस्तक हातात घेतलं. वाचावयास बसलो. तेव्हा विचारांची मांडणी वेगळी वाटली. प्रत्येक विचार जगणं शिकवतं. हे कसं जगणं शिकवतो. हे मांडताना त्यांनी आपले बौध्दिक कौसल्य, अनुभव पणास लावलं. त्यातून विचारांची प्रगल्भता दिसली. मनावरची छाप वाढत गेली. सामान्य माणसाचा जगण्याचा रोजचा संघर्ष. तो कटकटींनी चिंतातूर .त्या माणसाला बुध्द विचारांची सर्वाधिक गरज . हे पटत जातं. या विचारांची जगावर छाप पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धम्म कां निवडला. त्याचा उलगडा होत जातो. त्या बरोबर इंग्रजीतील हे पुस्तक वाचकांची उत्सुकता वाढवत जातं. पुस्तकातील प्रत्येक पान बोलकं. वाचकाशी संवाद साधतं. पुढे काय ! ही जिज्ञाशा वाढवत जातं. प्रारंभी जन्म, बालपण, राजगृहाचा त्याग, ज्ञानाच्या शोधातील साधना. सुजाताची खीर . हे प्रसंग भावनिक आहेत. बोधीवृक्ष. ज्ञानप्राप्तीची सुरेख मांडणी . अतिशय बोधप्रद आहे.
बुध्दम् शरणम् गच्छामी,
धम्मम् शरणम् गच्छामी,
संघम् शरणम् गच्छामी !
हे पटवून देताना बुध्द मार्गदर्शक . धम्म मार्ग .संघ शिक्षक होय. या तिघांच्या मदतीने सुखाची दिशा कळते. दु:ख हा जगातील मानव जातीचा प्रश्न . दु:खमुक्त माणूस. दु:खमुक्त समाज घडविण्याचा तथागतांचा ध्यास. दु:खाचे कारण आजार. हे दोन प्रकारचे. बाह्य आजार. आंतरिक आजार. याची उदाहरणं देतात. व्याधी असेल. तर त्यावर उपचार डॉक्टर करील. त्यासाठी डॉक्टर, मेडिसीन, नर्स लागेल. त्याचप्रमाणे आंतरिक व्याधी उपचारात बुध्द डॉक्टर आहे. धम्म मेडीसिन आहे. संघ डॉक्टरची सहाय्यक सेवा आहे. या शब्दात सांगतात. जीवनात बुध्द, धम्म आणि संघाचे महत्त्व पटवून देतात.
ज्ञानप्राप्तीने सिध्दार्थ बुध्द झाले. हे ज्ञान लोक कल्याणाचे. ते लोकांपर्यंत जावे. ते निर्णय घेतात. ज्ञानाच्या शोधात भटकणारे आठवतात. त्या जुन्या सहकाऱ्यांना शोधतात. ते पाच जण उर्वेलात भेटले. आता त्या स्थळाचे नाव बोधगया . ते जगप्रसिध्द झाले. ते पहिले पाच पारिवाज्जक. तेथून सारनाथला गेले. सात आठवडे थांबले. उपदेश केला. ती पहिली संबोधी . येथून धम्मचक्र प्रवर्तनास आरंभ . ते चक्र सातत्याने फिरतं आहे. ते थांबले नाही. पुढे कधी थांबणार नाही. हा धम्म विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा. माणसाला माणूसपण देणारा. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाणाची एकच तारिख .तथागत राजवाड्यात वाढले. हे सत्य . मात्र त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण तिन्ही महत्त्वाच्या घटना. निसर्ग सान्निध्यात घडल्या. हा योगायोग . ते निसर्ग म्हणजे अरण्यच . अन् त्याचंही निसर्गावर अलोट प्रेम. निसर्ग पायी पालथा घालत वस्त्या, नगरं गाठत गेले. आयुष्यभर धम्माचा प्रचार करीत राहिले.
सारनाथच्या पहिल्या उपदेशात तथागत बुध्द चार सत्य सांगतात. जगात दु:ख आहे. दु:खाला कारण आहे. कारण तृष्णा आहे. तृष्णेवर नियंत्रण मिळवा. हा दु:खमुक्तीचा उत्तम मार्ग .हेच सुखकर जगण्याचे सामर्थ्य . हे बुध्दाचे विचार लेखकाने मार्मिक पध्दतीने मांडले. त्या जोरावर वाचकाला पुढे वाचण्यास प्रवृत्त करते. जगताना वैयक्तिक, कौटूंबिक , सामाजिक प्रश्नांशी सामना असतो. ते प्रश्न सोडविण्यातच आयुष्य संपते. वय वाढतं. म्हातारपण येतं. मृत्यू येणार हे दिसू लागतं. शरीर थकलं. त्यांची वारंवार जाणीव होते. जवळची व्यक्ती गमावल्याचंही दु:ख होतं. या विचारांनी माणूस दु:खी होतो. त्यावर उपाय बुध्दाचे विचारदर्शनातून मिळतं. दु:खाची कारणं सहा आहेत. काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर आणि इर्षा. हे माणसातील अवगुण. हे दुर करणं . त्याला म्हणतात. स्वत:वर विजय मिळविणं. इतर सर्व विजयांपेक्षा स्वत:वर विजय मिळविणं सर्वश्रेष्ठ विजय . हाच सुखाचा मार्ग. सामाजिक, आर्थिक विवंचनेतील व्यक्ती व श्रीमंत व्यक्तीही दु:खी असतो. सुखी होण्यास भूतकाळ विसरा. भविष्यात काय होणार. ही चिंता सोडा. केवळ वर्तमानाचा विचार करा. वर्तमानात आनंदानं जगणं शिका. या एका वाक्यानं तथागताने जग जिकलं. सुखाने जगण्याचा मार्ग दाखविला. पुस्तक वाचताना हा सुखाचा मार्ग आपल्याच हातात आहे. सोपा आहे. असं सहजं वाटून जातं. केवळ मनाची तयारी असावी. यातून असंख्य प्रश्नांची उतरं मिळतात. वर्तमानात कसं जगावं .या बुध्द विचारांची सोपी मांडणी या पुस्तकात आहे. त्या कसोटीवर आपलं दु:ख तपासा. हे तपासणाऱ्या प्रत्येकाचं दु:ख संपेल. सुख दिसेल. हा विश्वास वाचताना मिळतं.
बुध्द शीलवान होते. ते व्यक्ती, समाज, राष्ट्र व जगास शीलवान करीत राहिले. प्रत्येक क्षण त्यावर खर्ची घातला. उपासक, उपासिकांना पंचशीलांचे पालन करण्यास सांगितले. त्यात जीव हत्या करणार नाही. चोरी करणार नाही. व्यभिचारापासून दूर राहीन, खोटं बोलणार नाही. मद्य, मोहापासून अलिप्त राहीन. या पाच शीलांचं ग्रहण करा. ही शिकवण दिली. सामान्य माणसाचे शरिरावर,मनावर व शब्दांवर नियंत्रण असावे. त्यासाठी पाच शीलांचे पालन करण्यास सांगितले. त्यातील एक शील खोटं बोलू नये. या शीलाचं पालन करणारी व्यक्ती समाज घडविण्यास समर्थ ठरते. खोटं बोलणं टाळावं. खोटं बोलणारी व्यक्ति कोणत्याही स्तरास जावू शकते. कोणाचेही वाईट करू शकते. खोटेपणा सोडा. सत्य बोला. सत्याची कालही गरज होती. त्यापेक्षा अधिक गरज आज आहे. अहिंसा हे एक शील. काळाच्या ओघात अनेक व्यक्ति व धर्मियांनी तो अंगिकारला. आपआपल्या सोईंने वापरला. बुध्दाच्या या पाच शीलांचे पालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यामुळे ते निश्चयी, निर्भिड होते. असंख्य लोंकांचे निस्वार्थ भावनेतून कल्याण करू शकले. ही पंचशीलांची शक्ती आहे.अशी ही पानं बोलू लागतात. त्यामुळे वाचक त्यात रमतो.
जीवन निर्दोष जगून निब्बाण गाठा. या मार्गात काम, क्रोध, द्वेष या अवगुनाने जीवन दुषित होते. त्यासाठी बुध्दाने अष्टांगिक मार्ग सांगितला. सुखी जीवन जगण्याचा हा मध्यम मार्ग होय. बुध्द अतिशय शांत होते. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण वेगळा होता. अष्टांगिक मार्ग सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी ही आहेत. या प्रत्येकावर लेखक पुस्तकातून संवाद साधतो. निसर्ग नियमाविरूध्द काही घडवू शकतो. ही गोष्ट मानू नये. निसर्ग आहे. निसर्ग चक्र सातत्याने सुरू असते. त्या निसर्गाचा उपभोग घ्या. निसर्गाच्या विरूध्द जावू नका. हे बुध्दाचे विचार. निसर्गावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न झाला. त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पृथ्वी, हवा, आग, पाणी यांचा उल्लेख करीत निसर्गाचे महत्व विषद केले. त्यांचा वापर कल्याणासाठी करावा. लेखक महापूर ,अतिवृष्टी, भूकंप, सुनामी, चक्रीवादळा सारख्या निसर्ग संकटांकडे लक्ष वेधतो. विज्ञानाचा उपयोग कल्याणासाठी व्हावा. दृष्ट हेतूसाठी करू नये. त्यातून विनाश घडेल. अशाच पध्दतीने आजिवीका, विपश्यनेच्या चांगूलपणाची मांडणी आहे. निसर्गाशी जूळवून घ्यावे. थंडी वाटली. तर ऊबदार कपडे घालतो.अशी अनेक उदाहरणं देत पटवून देतात.
बुध्दाच्या शिकवणीतील दहा पारमिता. या जगण्याचा शीलमार्ग होय. दान, शील (नीतिमत्ता), नैष्क्रिम्य ( ऐहिक सुखाचा त्याग), वीर्य ( हाती घेतलेले काम निष्ठेने पूर्ण करणे), शांती, सत्य, करुणा, अधिष्ठान, मैत्री ,उपेक्षा (निरपेक्षतेने प्रयत्न करणे) या दहा पारमिताचा अर्थ सांगतो. प्रज्ञा, शील, करुणेने जगण्याला कशी दिशा मिळते. हे लेखक पटवून देतो. या पारमिता बुध्दाची दूरदृष्टी दाखवितात.ही दूरदृष्टीची मोजपट्टी . बुध्द दार्शनिक होते. त्यांचे विचारात ईश्वर, आत्मा, कर्मकांड, मृत्यूनंतरच्या जीवनाशी संबंध नाही. ते या प्रकारांना नाकारतात. त्यांचा संबंध माणसाशी आहे. माणसाचे माणसाशी जगातील नाते जोडते. दु:ख, दैन्य, दारिद्र्यात जगणाऱ्यांना मार्ग दाखविते. धम्म मानवतावादी, समतावादी, विज्ञानवादी आहे. धम्म समता, बंधुता, प्रज्ञा, करुणा, मैत्री व मानवीमूल्याची शिकवण देते. दिव्याने दिवा पेटवित जा. जेवढे दिवे पेटवाल. तेवढा प्रकाश वाढत जाईल. त्या प्रमाणात अंधार कमी होईल. तसेच ज्ञान व आनंदाचे आहे. ते जेवढे वाटत जाल. तेवढे ते वाढत जाईल. ते कमी होणार नाही. या सिध्दाताने तथागत आयुष्यभर घम्म विचार वाटत राहिले. त्याच सिध्दाताच्या जोरावर भारत बौध्दमय करण्याचा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता आपल्या परीने त्यांनी बरेच केले. त्यांची जय बोलणाऱ्यांनी काय केले. हे स्वत: तपासावे۔ यात त्यांना उत्तर मिळेल. हे पुस्तक त्या प्रयत्नांचा एक भाग होय. विविध विषयांवर 14 प्रकरणं आहेत. अडीचशे पानांचं पुस्तक मोजक्या शब्दात मांडणं अशक्य. त्यासाठी पुस्तकचं वाचावं लागेल.
-भूपेंद्र गणवीर
..................BG......................