Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २३, २०२१

'टूलकिट' पार्टी विथ डिफरेंस सारखी...




कोरोना, मृत्यू आणि भाजप हे चित्र. देशभर आहे. भाजपच्या चुका देशाला भोवल्या. त्याची मोठी किंमत मोजली. प्रारंभी श्रेयाची स्पर्धा . टाळी, थाली, दिवे , पुष्पवृष्टी. अन् चुकांवर चुका. आता बदनामीचं खापर फुटलं. जगभर टिकेची झोड उठली. सुटावं कसं. ही धडपड. टुलकिट आणली. विदेशी हात सांगितलं. किसान आंदोलन लटकवलं. तोच प्रयोग पुन्हा. आता हा डाव उलटा पडला. कोरोनावर पहिल्या दिवसापासून राहुल गांधी राईट. राजधानीत मदतीत सुध्दा युकॉंचे श्रीनिवास व काँग्रेस आघाडीवर. भाजप,संघवाले बेपत्ता. लोक विचारू लागले. साहाजिकच तुलना सुरु झाली. तराजूचं पारडं हलकं पडू लागलं. चिंता वाढली. रेमडेसिवीर वाटण्याचा प्रयत्न केला. गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात अंगलट आला. मध्यप्रदेशात भ्रष्टाचारी अटक झाला. तो विहिंपचा निघाला. नकली इंजेक्शन. कनेक्शन गुजरात. मोदी मीडियाही निसटला. गंगेत तरंगणारी प्रेतं दाखवू लागला. दुसऱ्या लहरीची आंच त्यांच्या घरापर्यंत पोहचली.ते तरी करणार काय. गप्प कसे बसणार. विदेशी मीडियाने तर मोदी, भाजपला खलनायक ठरविलं. देशी मीडियानेही झोप उडविली. सगळा रोष पंतप्रधान नरेंद्र मोदींवर. निवडणूक प्रचार. अन् कुंभमेळा अंगावर. भाजप अस्वस्थ . बदनामी मागे काँग्रेसचा हात. त्यासाठी टूलकिटचा आधार. तातडीने काँग्रेसने एफआरआय दाखल केला. भाजपचा डाव उलटला. पुन्हा नवं झेंगट लागलं. तपास करा. सिध्द करा. टुलकिटचा सूत्रधार कोण. भाजप आयटी सेल की संबित पात्रा व त्यांचे रॅकेट. ट्वीटरने टूलकिट नकली असल्याचा निर्वाळा दिला. संबित पात्राच्या ट्वीटवर शेरा. त्यानं रॅकेट उघड पडलं. बचावासाठी सरकार धावलं. असंही पहिल्यादा घडलं. ट्वीटर तपास यंत्रणा नाही. सरकार तपास करेल असं म्हणनं ही मुजोरी.

' पार्टी विथ डिफरेंस ' असं म्हणणाऱ्या भाजपचा ताल बिघडला. तोल अगोदरच सुटला. बंगालचंच घ्या. निवडणकीत ममताने खेला केला. भाजपला पचलं नाही. लगेच सीबीआय पाठविली. नारद केसमध्ये सहा आरोपी. दोघे भाजपवासी झाले. त्यांना संरक्षण. तृणमूलच्या चौघांना अटक. हे एक प्रकरण नाही. देशभरात शंभरावर निघतील. भाजप वाशिंग मशीन असं लोक बोलू लागले.  ना खाऊगा, ना खाने दुंगा. ही वल्गना खोटी. भाजप में आवों और भ्रष्टाचार पचाओ.असं सर्रास दिसतं. सत्तेत इतक्या लवकर  इतकं अध:पतन. लोकपाल आलंच नाही. चौकीदार खूप वाढले. देश विकत सुटले. दोन कोटी नोकऱ्या देणं दूरचं. त्याच्या तिप्पटीने तरुणांच्या नोकऱ्या घालविल्या.   विदेशी  नितित घालमेल. शेजारचे मित्र राष्ट्र दुरावत आहेत. नेपाळ ,श्रीलंका, भूटान त्याची उदाहरणं. चीनची घुसखोरी वाढली. देश- विदेश नियंत्रणात नाही. चाल,चरित्र व चेहरा फेकटूलकिट सारखा. करनी आणि कथनीतही फरक पडला. कोरोनात सरकार पुर्णत: नागडं झालं. मोदी नापास नंबर एक. डोनाल्ड ट्रंम्प नंबर दोन. तरी देशभक्तीचा आव. सात वर्षात लोकहिताचं  केलं काय. 10 कुंबेरांच्या संपत्तीत भरमसाट वाढ. ही कामगिरी.

 कोरोनात सरकार अपयशी ठरलं. हे लक्षात आलं. लगेच  संघ प्रमुख मोहन भागवत खेसकले. चुका झाल्या. गफलतपणा भोवला. त्याला लोकही जबाबदार. लोक मेंढरं . त्यांना जसं हाकाल. तशी ती जातात. त्यांच्यावर निवडणुका लादल्या. लादणारा कोण.. प्रचारात नियमं मोडले. अनुकरण त्यांनी केलं. चुकले कोण.. कोरोनाने भागवत यांना पकडलं. 15 दिवस जखडलं. दोन अडीच लाखाचं बील वसुललं. त्या कारणाने बोलणं भाग पडलं. ज्यांच्याकडे हजार, पाच हजार नाहीत. त्यांना मृत्यू जवळ करावं लागलं. शरणावर जाव लागतं. एैपत नसणाऱ्यांचा नदी किनारी रेतीत दफन. नदीत तरंगावं लागलं. त्यांना गरीब ठेवण्याचं कारस्थान कोणाचं. तुमची संस्कृती. मोदी सरकार दोषी नाहीत. तेच दोषी आहेत. नदीत तरंगणारे.  गरीब माणसं. कधी तरी कबुली द्या. चुकलं आमचं. इशारा केला असता. अंबानी, अदाणींना सर्व प्रेतांची विल्हेवाट लावली असती. सत्तेच्या मस्तीत हे सूचतं कोणाला. टाळूवरच्या लोणीत मस्त. गंगा शुध्दीकरणाचं कंत्राट असलेलाही लंपला. कंत्राट देणाऱ्या उमा भारती हरवल्या. यावर पडदा टाका. बदनामी थांबवा. मोदींना वाचवा. त्यासाठी टूलकिटचा बहाणा. त्यामध्ये असलेले आरोप राहुल गांधी यांनी जाहिररित्या केलं.  ट्वीट त्याचे पुरावे. त्यात कुंभमेळा दोषी. हा आरोप त्यांनीही टाळला. हा एक जास्तीचा आरोप. टूलकिटमध्ये भरला. दिला काँग्रेसवर फेकून. 

मोदी सरकारच्या देशविदेशातील बदनामी  मागे.  राहुल व काँग्रेसचा हात. व्वा रे सरकार.  तुम्हाला तुमच्या इमेजची पडली. तीन लाखांवर माणसं मेली. त्यांच्या कुटूंबियांना  कसं पटविणार. 20 कोटी मध्यमवर्गीय उपचाराने गरीब झाले. दारीद्ररेषेखाली गेले. त्यांना कसं सांगणार. सरकार तुमचं. व्यवस्था तुमची. चुकले मोदी . हे उघड दिसत आहे.  काँग्रेस सारखी ओरडत होती. सरकारला जागवित होती. तेव्हा भाजप जागली नाही. आता कोरोना लहर थोडी मंदावली. त्या बरोबर टूलकिटचा हार काँग्रेसच्या गळ्यात. चांगलं असेल ते  मोदीच्या गळ्यात. मोदी है तो मुमकीन है. जिथं चुकलं . तिथं सत्तर वर्ष. काँग्रेस अन्  राहुल. जसं काही जन्माच्या दुसऱ्याच दिवशी. राहुल रांगत काँग्रेसमध्ये गेले. आजीच्या कडेवर गेले असतील. तरी सत्तर होत नाही. भाजपचं गणितचं कच्चं. त्या गणितानं देशाची वाट लावली. अर्थव्यवस्थेचे दिवाळं काढलं. 

भाजपचं लसींच गणित घ्या. सरकार म्हणते, डिसेंबरपर्यंत 100 कोटींना लस लावू. त्यासाठी हव्यात 200 कोटी लसी. 65 वर्षावरील 20 कोटी कमी केले. तरी 180 कोटी लसी हव्यात. म्हणजे दररोज एक कोटी लोकांना लस लावावी लागेल. महिन्याला साडे सात कोटी लस उत्पादन क्षमता. त्या सर्व भारताला देणार की निर्यात करणार. कंपन्यांनी अगोदरचं केलेत करार. ते तुम्ही कसे बदलणार. लसींच नाहीत. अन्  टूलकिटचं काय घेऊन बसलात. तुम्ही चुकले. विसरले. तरी लोकांना हिशेब पाठ आहे. त्यांची त्यांनी किंमत मोजली आहे. कोरोना पिकवर होता. तेव्हा 6 एप्रिल रोजी बंगालात ' दिदी ओ दिदी ' गळा काढत होते. 28 मार्चपर्यंत लस, किट, दवाई, इंजेक्शनची निर्यात सुरु होती. त्याच दिवशी कोरोनावर विजय मिळविला. याबाबत जगासमोर स्वत:ची पाठ थोपटविली. हे जग बघत होतं. काँग्रेस खेसकली. तेव्हा 29 मार्च रोजी निर्यात थांबविली.त्या बंदी आदेशात चुका. दसऱ्या दिवशी दुसरा बंदी आदेश काढला. तो पर्यंत वॅक्सीन मैत्रीचा पाठ देत होते. पाकसह अनेक देशांना लस पाठवित होते. एका पोस्टरने इतकी मिरची लागली.ज्यांनी मुलं गमावली.त्यांना काय वाटत असेल. विचार करा. दगड बनू नका.

हमारे बच्चो की लस विदेश क्यो भेजी. त्याचे पोस्टर दिल्लीत झळकले. लोकांचे आत्मे भडकले. कारण कोरोनाने मुलांबाळांचा बळी घेतला. पोस्टरमध्ये काय खोटं होतं. सत्य तेच म्हटलं होतं. त्यासाठी डझनभर माणसांना अटक. म्हणतात ना, विनाश काळे, विपरित बुध्दी. ही त्याची प्रचिती . गोष्ट आहे लसींची. आताची गती बघता 100 कोटीं लोकांना लस अशक्यच आहे. लसींच नाहीत. विकत घेतल्या नाहीत. बूकही केल्या नाहीत.  त्या अगोदर तिसरी लहर येणार. ती भयानक असेल. असं भाकीत आहे. पैसेवाल्यांची विदेश बुकींग चालू आहे. राष्ट्रभक्त म्हणवून घेणारे तेच. बाकी राहणाऱ्यांना कोरोनाशी सामना करावं लागेल. तिथं सरकार कुठं असेल. तेव्हा ते दिसेल. सध्या दुसरी लहर गावांकडे आहे. तिसऱ्या लहरची दशशत आहे .लोक चिंताग्रस्त आहेत. सरकार टूलकिटचं तुणतुणं वाजवत आहे.


- भूपेंद्र गणवीर
..................BG......................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.