Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ३१, २०२१

केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पप्पू देशमुखकडून महापौरांची बदनामी

लेखा परीक्षण अहवाल प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : महापौर 

चंद्रपूर : उपसंचालक महानगरपालिका लेखा परीक्षण विभाग यांचा लेखा परीक्षण अहवाल आज सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर यांनी निवेदन दिल्यानंतर न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. मात्र, असे असतानाही केवळ प्रसिद्धीसाठी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्याकडून कोणतेही पुरावे आणि तथ्य नसतानाही महापौर राखी कंचर्लावार यांच्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. 


2015-2016 या वित्तीय वर्षामध्ये झालेल्या कामाच्या लेखापरीक्षकांत 71 त्रुटी निघाल्या. 2015-2016 या वित्तीय वर्षामध्ये स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचेच नगरसेवक होते. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. असे असतानाही नगरसेवक पप्पू देशमुख यांनी "200 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून महापौर राखी कंचर्लावार यांनी राजीनामा द्यावा" अशा शीर्षकाची प्रेसनोट प्रसिद्धीमाध्यमाना पाठविली. लेखापरीक्षकांत त्रुटी निघाल्या म्हणजे गैरव्यवहारच झाला, असा आरोप करणे चुकीचे आहे. माध्यमात नियमित चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्याकडून न घडलेल्या गोष्टीचा बाऊ केला जात आहे. यामुळे महानगरपालिकेसह महापौरांची विनाकारण बदनामी केली जात आहे. भोजन पुरवठा, डबा, कचरा,प्रसिद्धीच्या कामात करोडो रुपयांचे मोठे घोटाळे झाले, असे भासवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम नगरसेवक पप्पू देशमुख करीत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी उठसूट प्रेसनोट काढून बदनामी करणाऱ्या नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या आरोपावर जनताच उत्तर देईल. 

 

त्रुट्या म्हणजे गैरव्यवहार नाही

आरोप करणाऱ्या नगरसेवकाने आधी महानगरपालिका अधिनियम पुस्तक वाचायला हवे. प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे कार्य आणि अधिकार हे समजून घ्यावे. स्वतःचा मूर्खपणा झाकण्यासाठी आरोप- प्रत्यारोप करणे म्हणजे मोठेपणा नव्हे. लेखा परीक्षण अहवाल हा प्रशासकीय विषय आहे. लेखापरीक्षकांत त्रुटी निघाल्या म्हणजे गैरव्यवहारच झाला, असा आरोप करणे चुकीचे आहे. 

- राखी संजय कंचर्लावार, महापौर

काय म्हणाले पप्पू देशमुख

उपसंचालक महानगरपालिका लेखा परीक्षण विभाग यांचा लेखा परीक्षण अहवाल आज सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता.2015-2016 या वित्तीय वर्षामध्ये सौ. राखी कंचर्लावार  महापौर असताना सुमारे 200 कोटी रुपयांच्या कामात अनियमितता व भ्रष्टाचार  झाल्यामुळे लेखापरीक्षकांनी 71 त्रुटींवर बोट ठेवलेले आहे.चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार याला प्रशासकीय बाब म्हणून जनतेची दिशाभूल करित आहेत व खोट बोलत आहेत. सत्ताधाऱ्यांनी संगनमत करून आज जाणीवपूर्वक  आमसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्याचे टाळले.तांत्रिक गोष्टीचा गैरफायदा घेऊन ऑनलाइन उपस्थित असलेल्या नगरसेवकांचा आवाज बंद केला व सभा आटोपती घेतली. 

पहिल्या इनिंगप्रमाणेच महापौर राखी कंचर्लावार  यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भोजन पुरवठा  घोटाळा,  डबा घोटाळा,कचरा घोटाळा,प्रसिद्धीच्या कामातील घोटाळा असे करोडो रुपयांचे  मोठे घोटाळे झाले. त्यांच्या दोन्ही कारकिर्दीमध्ये  प्रशासनाकडून करोडो रुपयांच्या कामात भ्रष्टाचार किंवा अनियमितता होणे हा योगायोग आहे का  ?   याचा अर्थ एक तर त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नसावे किंवा त्यांनी प्रशासनासोबत संगनमत करून जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा दुरुपयोग केला असावा.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत   नैतिकतेच्या आधारावर महापौर राखी कंचलवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली.

अशाच प्रकारे देशाच्या महालेखा परीक्षक व नियंत्रक (कॅग) यांच्या अहवालावरून भाजपने तत्कालीन पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारविरुद्ध रान उठवले होते. जनतेने सुद्धा पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारला निवडणुकीत जागा दाखवली होती. ही बाब महानगरपालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावी.

लेखापरिक्षण अहवालावर महापौर राखी कंचलवार यांना नगरसेवक पप्पू देशमुख यांनी जाहीर आव्हान दिले.महापौर म्हणतील 'तेव्हा' व 'जिथे म्हणतील तिथे'  जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. सत्य काय आहे ते जनतेसमोर यायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

शहरात तिव्र पाणी टंचाई आहे.पाणी टंचाई निवारणाचा कृती आराखडा मनपाने तयार केला नाही. केवळ 8 टॅन्कर च्या भरवशावर दररोज 150 ते 200 ट्रीप पाणीपुरवठा शक्य नाही. टॅन्करची संख्या वाढविली नाही.

रात्र-रात्रभर वाट पाहूनही लोकांना पाणी मिळत नाही.टॅन्कर साठी निधी नाही,मात्र प्रसिद्धीसाठी लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे. भ्रष्टाचार करणे व भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी खोटी प्रसिद्धी करणे याच गोष्टीला मनपातर्फे सध्या प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.