save image on google |
अख्खे गाव तापाने फणफणतेय!
मेहा बुज येथील तिघांचा मृत्यू; रविवारी लागणार शिबीर
सावली/ प्रतिनिधी:
तालुक्यातील मेहा बुज हे अख्खे गाव तापाने फणफणत आहे. कोरोनाच्या भितीपोटी अनेकजण दवाखान्यात जाण्यास घाबरत आहेत. गावातील ७० टक्के लोक आजारी आहेत. दरम्यान आज शनिवारी शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. आता आठवडाभरात मृतांची संख्या ३ झाली आहे.
तालुक्यातील मेहा बु. हे गाव गत २ आठवड्यापासून तापाच्या साथीने हैराण झाले आहे. तापाच्या साथीने गावातील एकाचा पहिला बळी गेल्यानंतरही जीवघेण्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले. दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याची व्यवस्था नाही. कोरोनाची दहशत असताना गावात तापाची प्रचंड साथ आली. सर्व घरांमध्ये तापाचे रुग्ण आहेत. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने भीतीपोटी अनेकजण कोरोना चाचणी करण्यास पुढे आलेले नाही.
काही तरुणांनी स्वतःहुन चाचणी करून घेतली. पॉझिटिव्ह रुग्णांवर सावली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या ठिकाणी तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे. गावात चाचणी शिबीर लावण्याची गरज आहे. ताप असल्याने अनेकांनी कोरोनाची लसदेखील घेतलेली नाही. हीच परिस्थिती शेजारच्या गावात आहे. या आठवड्यात आबाजी पेंदाम, हरबाजी कोलते, शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. गावातील ३ जण दगावल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विशेष शिबिर लाऊन आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी दिली आहे.
अंतरगाव, निफंद्रा, गेवरा, मेहा येथील सर्व साधारण पॉझिटिव्ह रुग्णांसाठी निफंद्रा येथील आडेपवार हायस्कुल येथे विलिगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे.