सतरंजीपुरा झोन सहायक आयुक्तांचे लग्न समारंभ आयोजकानाला पत्र
नागपूर, ता. ८ : कोरोना नियमांची पायमल्ली करीत लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या परिवारावर कारवाईनंतर आता मनपा लग्नात सहभागी सर्व वऱ्हाड्यांची कोरोना आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी करणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार यासंदर्भात सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने यांनी लग्न समारंभ आयोजक राजेश समुंद्रे यांना नोटीस दिले आहे. सोमवारी १० मे रोजी लग्न समारंभात उपस्थित सर्व वऱ्हाडी, शेजारी, पाहुणे या सर्वांची मनपाच्या मोबाईल चाचणी केंद्रावरून कोरोना चाचणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरातील ही पहिलीच कारवाई आहे.
स्वीपर कॉलनी, सतरंजीपुरा झोन कार्यालयासमोरील रहिवासी राजेश समुंद्रे यांनी ५ मे २०२१ रोजी लग्न समारंभ आयोजित केला होता. परवानगी नसतानाही लग्न समारंभामध्ये १५० ते २०० लोक उपस्थित होते. याबाबत तातडीने दखल घेत मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करीत राजेश समुंद्रे यांचेकडून ५० हजार रुपये दंड वसूल केला.
शहरात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने लग्न समारंभात सहभागी सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचा मनपाने निर्णय घेतला. सोमवारी १० मे रोजी सकाळी ९ वाजता लग्न समारंभ आयोजकांच्या घराजवळ मनपाच्या मोबाईल चाचणी केंद्रावर सर्वांची आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी केली जाणार आहे.