चंद्रपूर : म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने चंद्रपूर जिल्ह्यात शिरकाव केला आहे.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 48 वर पोहचली असून 26 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे.राज्यात म्युकरमायकोसिसचे 1,500 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी हा काय प्रकार आहे?
म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे कोरोना विषाणूमुळे उद्भवते. हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.
सर्वाधिक धोका कोणाला?
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.
काळ्या बुरशीची लक्षणे
काळ्या बुरशीमध्ये बर्याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.
बचाव कसा करायचा?
काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा
तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.