यवतमाळात केंद्रीय पथकाद्वारे लसीकरण व कोरोना केंद्र पाहणी
यवतमाळ/ सतीश बाळबुधे
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची सं‘या तसेच मृत्युंचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक गुरुवारी यवतमाळ येथे दाखल झाले. पथकातील राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्रा. डॉ. जयंत दास आणि राममनोहर लोहिया हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती यांनी शहरातील पाटीपुरा येथील लसीकरण केंद्र व वाघापूर मार्गावरील कोविड केअर सेंटरची पाहणी केली.
यावेळी डॉ. दास व डॉ. भारती यांनी लसीकरण केंद्रातील नोंदणी कक्ष, लसीकरण प्रतीक्षा कक्ष, निरीक्षण कक्षाची पाहणी करून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करायला सांगितले. केंद्रीय पथकाच्या समक्ष उपस्थित नर्सने लाभार्थ्याचे लसीकरण केल्यानंतर संबंधित नागरिकाला शासनाच्या सूचना समजावून सांगितल्या. लसीकरणानंतर एखाद्याला रिअॅक्शन आली तर काय उपाययोजना करता, लसीकरणाबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण दिले का, अशी विचारणा केली. शहरी व ग‘ामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षण दिल्यानंतरच जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. तसेच एखाद्याला रिअॅक्शन झाली तर संबंधित व्यक्तीला लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले जाते. यासाठी लसीकरण केंद्रावर रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.
यानंतर केंद्रीय पथकाने वाघापूर रोडवरील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. येथे कशाप्रकारे टेस्ट केली जाते. सध्या किती रुग्ण या केंद्रात भरती आहेत, त्यांना लक्षणे आहेत का, याबाबत माहिती घेतली. यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खोडवे यांनी पथकाला माहिती दिली. या केंद्रावर 70 टक्के नागरिकांचे आरटीपीसीआर व उर्वरित 30 टक्के लोकांची अॅन्टीजन टेस्ट केली जाते. सद्यस्थितीत येथे 58 रुग्ण दाखल असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच रुग्णांची सकाळ, संध्याकाळ आणि रात्री नियमित तपासणी केली जाते. यात ताप, ऑक्सिजन स्तर तपासण्यात येत असल्याचेही डॉ. खोडवे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तडपल्लेवार, डॉ. विजय अग‘वाल, डॉ. रमा बाजोरिया, आयएमएचे अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड उपस्थित होते.