निवडणूक येते. पाठोपाठ आचार संहिता . तिचा धाक मोठा . अलिकडे हा धाक घटला. आयोग दरारा गमावून बसला. टी.एन. शेषन यांनी जे कमावले. ते आजच्या निवडणूक आयुक्तांनी गमावले. या विधानावर सर्वांचेच एकमत. सत्ताधाऱ्यांना तर अजिबात धाक नाही.
उमेदवारांच्या गाडीतून ईव्हीएम जातात. एवढी हिंमत कुठून येते. या अगोदरही ईव्हीएम कधी हॉटेलात. तर कधी कुठे सापडल्या. कर्मचाऱ्यांवर वचक नाही. कधी बिघाड. कधी ईव्हीएमची पळवापळवी. अशी प्रकरणे वाढली. बूथ बळकाव प्रमाणे ईव्हीएम बळकाव. हा नवा फंडा आला. याबाबत तक्रारी येतात. त्या सर्व रफादफा होतात. आयोगाचे काम संहितेचे पालन करणे. उल्लंघन असेल तर कारवाई . आयोगच कारणं देत असेल. वाहन खराब झालं म्हणत असेल. तर कसे चालेल. काही तरी काळबेरं असल्याचा संशय येणारचं. आदर्श आचार संहिता नावापुरती. हे पतन की अध:पतन . अलिकडे ती अधिकच वादग्रस्त ठरते. तिचे कारण दबाव. तटस्थतेचा अभाव.
आस्था पणाला....
देशात अनेक मुख्य निवडणुक आयुक्त झाले. आठवतात तेवढे टी.एन.शेषन. त्यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकत्र आणले. विचारविमर्श केला. त्या मंथनातून आचार संहितेला आदर्शचं लेबल लागले. आदर्श आचार संहितेत मते मागण्यास जाती, धर्म, सांप्रदायिक भावनेचा प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष आधार घेता येत नाही. आस्था स्थळांचा प्रचारासाठी वापरास मनाई. ते मग मंदिर असो की मस्जिद. चर्च असोकी गुरुद्वार. आस्थेचा मतांसाठी वापर नको. बोलण्यातून आणि लिहिण्यातूनही. पश्चिम बंगालच्या प्रचारातील जय श्रीराम, चंडीपाठ. आस्थेशी संबंधीत आहेत. इथं तर ममता यांना डिवचण्यासाठी वारंवार जयघोष होतो. या जयघोषाचा आस्थेशी संबंध नाही. हे छातीठोकपणे कोणी सांगू शकेल. यावर निर्णय होत नाही. निवडणूक आयुक्त दखल घेत नाही. आयोगच लपतो. एसआरपीचे जवान मतदारांना रोखतांना दिसतात. तेव्हा नंदीग्राममध्ये तणाव वाढतो. तृणमूल नेत्या ममता यांना मतदान केद्रात जावं लागतं. राज्यपालांना फोन लावावं लागतं. न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. एसआरपीच्या गणवेषात भाजपचे कार्यकर्ते आहेत. हे सांगावे लागत असेल तर आयोगाचे काम काय. या आरोपात तथ्थ असेल. तर ते गंभीरच .ईव्हीएम पळवापळवी पेक्षा मोठा गेम म्हणावं लागेल. कुबड्यांच्या मदतीने वाजपेयी सरकार आलं. तेव्हा ममता बॅनर्जी ह्या त्यापैकी एक होत्या. हे विसरून कसं चालेल. विचारांशी फारकत. धरसोड वृत्ती. एक दिवस खड्ड्यात नेते. भाजपला शह देण्यास चंडीपाठ किंवा मंदिर यात्रा काढून कसे चालेल. बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी स्वत:चा अजेंडा ठरवला.अन् तो राबवला. त्याने भाजपला सडो की पडो करून सोडले. तेव्हा निती-अनितीचा खेळ झाला. त्या चक्रव्यूहात तेजस्वी एकटा लढला. लढतो आहे. तेव्हा मदतीला ममता गेल्या नाहीत. तेव्हा सर्व भाजप विरोधकांनी मदतीला जावे असं त्यांना वाटलं नाही. त्यांची घेराबंदी झाली. तेव्हा पत्रव्यवहार केला. ही पाळी आणखी कोणाकोणावर येते. हे भविष्यात कळेल. सध्या ममताला भाजपच्या धन,बल,भेद,दंड अन् आस्थेच्या वारूळानं घेरलं आहे.जखमी वाघिणीवर आस्थेचा वाघ सोडण्यात आला . या वाघाला रोखण्याची कुवत निवडणूक आयोगात नाही. त्यामुळे फावते आहे.
आता विरोधकांचा धावा..
तृणमूलची नेत्या ममता बॅनर्जी. त्यांनी स्वत:ला संबोधले जखमी वाघिण. त्या निमित्ताने इशारा दिला. जखमी वाघिण जास्त खतरनाक. या इशाऱ्याचे भविष्य मे च्या प्रारंभी कळेल. त्या दिवसाची प्रतीक्षा करते अख्खा भारत. मीडियात दोन महिन्यापासून कांथ्थाकूट सुरु आहे. दुसऱ्या टप्याचे एक एप्रिलला मतदान झाले. त्या नंदीग्रामला दोन लक्षवेधी रोड शो झाली. जखमी शेरनीने आठ किलोमीटर लांब ' रोड शो ' केला. व्हिलचेअरमध्ये बसून. देशाचे गृहमंत्र्यांने दहा किलोमीटर लांब 'रोड शो ' केला. ट्रकरुपी रथातून. रथावरून महाभारत आठवलं. मुख्य मीडियाने प. बंगालच्या निवडणुकीला महाभारत म्हटले नाही. हे सातत्याने टाळले. एकाद अपवाद असेल. किती मोठं नियोजन. एकिकडे एकटी महिला मुख्यमंत्री. त्यांच्या विरोधात उतरले. अनेक रथी-महारथी.काही घरभेदी. चित्र तसेच आहे महाभारताचे. ममता एकटी स्टॉर प्रचारक. सोबतीला तृणमूलचे कॅडर आहे. दुसरीकडे डझनावर मंत्री. पीएम, एचएम. सोबतीला श्रीराम सेना. नारे सुध्दा जोशीले. खेला होबे विरूध्द जय श्रीराम. तिसरीकडे लेप्ट काँग्रेसचा प्रचार. चर्चा केवळ तृणमूल,भाजपची आहे. हेलिकॅप्टर आहेत. हल्ले आहेत. प्रतिहल्ले आहेत. पैशाचा महापूर आहे. आचार संहितेचा धुव्वा आहे. नैतिकतेचा ताणाबाणा छिन्नविछन्न आहे. या धामधुमीत ममता यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना पत्र लिहलं. केंद्र सरकारच्या विरोधात सर्वाना एकत्र लढ्याचे आवाहन केले. सत्ता आली की विसर पडेल. पुढची निवडणूक आली की आठवेल. महाराष्ट्रात जसा आघाडी सरकारला भीमा कोरेगावचा पडला आहे.
बिहारी अजेंडा
बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव चक्रव्यूहात अडकले होते. एकाकी लढा दिला. तेव्हा त्यांनी त्यांच्या पक्षाचा अजेंडा तयार केला. बेरोजगारी, आर्थिक मुद्द्यावर प्रचारात उतरले. भाजप आस्थेचे मुद्द्यांसोबत लालूराजवर आक्रमक होती. हिंदी पट्ट्यातील बिहार, उत्तरप्रदेश हे ते राज्य आहेत. त्यांनी मंडलच्या जोरावर कमंडल लाटेला अनेक वर्ष रोखून धरले. तेव्हा भाजपने काही पक्षांच्या कुबड्या घेतल्या. सत्तेची संधी येताच त्या फेकून दिल्या. फेकलेल्या त्या पक्ष कुबड्या निकामी झाल्या. सर्वात मोठे उदाहरण तेलगू देशम्. ते चंद्राबाबू नायडू दिसेनासे झाले. शार्टटर्म फायद्यासाठी केलेल्या तडजोडी महागात पडल्या. भाजप विरोधी पक्षांची मोट बांधून सामना स्वप्न ठरेल. स्पष्ट वैचारिकतेची मोट बांधावी लागेल. तेव्हाच सामना रंगेल. इतिहास साक्ष आहे. भाजप गरजेप्रमाणे रूप बदलतो. निवडणूक असेल तर सत्तेसाठी हिंदुत्व. आरक्षण द्यावयाचा मुद्दा आला की, जाती, जमाती, ओबीसींमधील हिंदुत्वाचा विसर पडतो. उच्चवर्णियांच्या 10 टक्के आरक्षणा सारखं प्राधान्य नसतं. मराठा, पटेल, गुजर, आंदोलन तोंडी लावण्या पुरतं. या विसंगतीबाबत प्रबोधन नसेल. तर निवडणुकी पुरती मोट कामाची नाही. पक्षाचा कॅडर असावा. तो वैचारिकतेने परिपक्व हवा. नाहीतर आस्थेच्या पुरात वाहून जाणार. मतांच्या बाजारात आस्थेचा कल्पकतेने वापर आहे. फक्त नारा आहे. निवडणूक आयोग आहे. तो अस्तित्वहिन आहे. त्यामुळे सर्वांचे फावते. ईव्हीएम ताबा. आस्थेचा वारा. हा नवा धोका आहे. प्रचारक तयार आहे.अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले. शेतकरी सीमेवर आहे. हात रिकामे होत आहेत. भूकेचे चटके बसत आहेत. चिंता कोणाला आहे.
-भूपेंद्र गणवीर
.................BG.........................