एचडीएफसीचे एटीएम फोडून लाखोंची रक्कम केली लंपास
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
नागपूर-अमरावती महामार्गावरील वडधामना तकिया येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांची रक्कम लुटल्याची घटना रविवार ४ एप्रिल रोजी समोर येताच परिसरात खळबळ उडाली.
वडधामना तकिया जवळील दर्गाच्या बाजूने पाली कॉम्प्लेक्समध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. व्यावसायिक परिसर असल्याने दिवसभर येथे वर्दळ असते. शनिवारी रात्रीच्या सुमारास संचारबंदीमुळे हा परिसर सुनसान होता. एटीएमच्या समोर खुल्या जागेत काही ट्रक पार्क केलेले होते. शनिवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान प्रथम चोरट्यांनी एटीएम समोरील खुल्या जागेतील स्ट्रीट लाईट बंद केला. नंतर सायरनचे कनेक्शन कापले व गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन मागच्या बाजूने कापून त्यातील संपूर्ण रक्कम गोळा करून व शटर खाली करून पळून गेले असल्याचा अंदाज आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच वाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. नंतर पोलिस उपायुक्त नरुल हसन पोहोचले. याचदरम्यान एचडीएफसी बँकेचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले.