अत्यावश्यक सेवेसाठी रूग्णालयाच्या रक्तपेढीत विनावेतन श्रमदान
७ महिन्याचा पगार मिळालेला नाही, २ महिन्यांपासून रस्त्यावर डेरा टाकून आंदोलन सुरू आहे.तरी शासनाला हक्काचा पगार देण्यासाठी तोडगा काढता आलेला नाही.उपासमारीची वेळ आलेले शेकडो कामगार जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात थकित पगार व किमान वेतनासाठी संघर्ष करीत असतानाही माणुसकीला विसरले नसल्याचे आंदोलनकर्त्या कामगारांनी एका घटनेतून दाखवून दिले.सरकारी दवाखान्याच्या रक्तपेढीतील सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात जावे लागले. त्यामुळे रक्तपेढीत सफाई व इतर कामासाठी एकही कर्मचारी ड्युटीवर नसल्यामुळे रक्तपेढीचे कामच ठप्प होण्याची वेळ आली.
रक्तपेढी प्रमुख डॉ.अनंत हजारे यांनी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना पत्र लिहून रक्तपेढीतील कंत्राटी कामगारांना आंदोलनातून सोडण्याची विनंती केली.कामगारांनी डेरा आंदोलना सोबतच काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे.त्यामुळे कोणीही कामगार ७ महिन्यांचा थकीत पगार मिळेपर्यंत ड्युटीवर जायला तयार नाही.मात्र रक्तपेढीचे काम ठप्प झाल्याने एखाद्या रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो याची जाणीव ठेवून आंदोलनकर्त्यां कामगारांनी या समस्येतून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला.कामगारांनी चर्चा करून गांधीगिरीच्या मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचे ठरविले.अमित श्रीकोंडवार, देवेंद्र कुडवे व गोविंद पेंदोर हे रक्तपेढीतील कंत्राटी कामगार आळीपाळीने रक्तपेढी श्रमदान करून सेवा देतील.मात्र ड्युटीवर हजेरी लावणार नाहीत व सेवेचा मोबदला सुद्धा घेणार नाहीत. विनावेतन श्रमदान करण्यासाठी रक्तपेढीमध्ये हजर झाल्यानंतर या तीनही कामगारांचे रक्तपेढी प्रमुख डॉ.अनंत हजारे,समाजसेवा अधीक्षक पंकज पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच कामगारांना श्रमदान करीत असल्याबाबतचे पत्र सुद्धा दिले.
रुग्णसेवेसाठी विनावेतन श्रमदान करून आंदोलकांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडविले.मात्र कामगारांच्या खात्यात थकीत पगार टाकून तसेच कोविड योध्द्या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून वैद्यकीय शिक्षण विभागाने कर्तव्याला जागावे अशी अपेक्षा डेरा आंदोलनातील कामगारांनी व्यक्त केलेली आहे.